काष्टी गावाला आमदार असून, अडचण आणि नसून खोळंबा – विक्रम संभाजीराव पाचपुते..

दिनांक १८ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा/नगर मतदारसंघात सध्या विधानसभेची रणधुमाळी गाजत असून विकासाच्या मुद्यावर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. या पार्श्वभूमीवर श्री विक्रम संभाजीराव पाचपुते यांनी विद्यमान परिस्थितीवर जोरदार टीका केली आहे.

गेल्या ४० वर्षांपासून मतदारसंघात सत्ता भोगणाऱ्या बबनराव पाचपुते यांच्या काळात काष्टी गावात विकासाची वानवा असल्याचा आरोप करताना विक्रम पाचपुते म्हणाले की, “गृहराज्यमंत्री, वनमंत्री, आदिवासी विकासमंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या पदांवर राहूनही काष्टी गावात भरीव विकास का झाला नाही, याचे उत्तर विद्यमान उमेदवारांनी द्यावे.”

काष्टीतील रेड झोनचा प्रश्न २५ वर्षांपासून प्रलंबित आहे. गावात सार्वजनिक शौचालय, पोलीस चौकी, एसटी स्टँड, भूमिगत गटार यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. एसटी स्टँड नसल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच ऊन, वारा आणि पावसात बस थांबवावी लागते. याशिवाय, हायवेवर रस्त्याला लाईट नसल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

वाड्यांवर जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था, स्मशानभूमीतील अस्वच्छता आणि गावात पोलीस पाटील व कोतवाल पदे गेली २० वर्षे रिक्त असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

श्री पाचपुते यांनी मतदारांना आवाहन करताना म्हटले की, “बबनराव पाचपुते यांच्या भाषणांमधील भावनिक गोष्टींवर न जाता वास्तव परिस्थिती विचारावी. त्यांच्या कार्यकाळात गावातील किती कार्यकर्त्यांच्या मुलांना रोजगार मिळाला..? आणि किती लोक वाऱ्यावर सोडले गेले..? याचा हिशोब मागावा.”

उद्या श्री संदीप नागवडे यांनी या प्रश्नांना उत्तर द्यावीत, अशी अपेक्षा विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केली आहे. या मुद्द्यांवर भावनिकतेच्या आड सत्य लपवण्याचा प्रयत्न होऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. काष्टीच्या विकासाचा आलेख आणि विद्यमान नेतृत्वाने गावाला दिलेला न्याय यावर आगामी निवडणुकीत जनतेचा कौल काय असेल.? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading