भारतीय जनता पार्टीने पहिल्या यादीत ९९ उमेदवार जाहीर केले होते. यात प्रकृती अस्वस्थतेमुळे सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या आमदार बबनराव पाचपुते यांच्या ऐवजी त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली. पण विक्रम पाचपुते यांनी आपल्या आईचा अर्ज मागे घेण्याची धमकी देत पक्षाला कोंडीत पकडले आणि विक्रम पाचपुते अनपेक्षितपणे उमेदवार झाले. यावर भाजप सहितच पाचपुते समर्थकांमधून सुद्धा तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या सुवर्णा पाचपुते यांनी बंडखोरी केली. तर भाजपचे जेष्ठ नेते राजेंद्र म्हस्के यांनी अपक्ष राहुल जगताप यांची वाट धरली.

आता निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आलेली असताना देवेंद्र फडणवीस यांना मानणारे आणि पूर्वाश्रमीचे पाचपुते यांचे निकटवर्तीय असलेले अवधुत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सोशल मीडियावर आपल्या भावना मांडत भाजप उमेदवार विक्रम पाचपुते यांच्यावर हल्ला चढवला आहे. आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या विक्रम पाचपुते यांना निवडून दिल्यास भारतीय जनता पार्टीची प्रतिमा राज्यात मलिन होईल, तसेच उद्या असा माणूस निवडून गेल्यास तुम्हाला सुद्धा विरोधक विधानभवनात निरुत्तर करतील, त्यामुळे भाजपला मानणारे आम्ही लोक विक्रम यांना स्वीकारणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

१९८० साली बबनराव पाचपुते यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची पायाभरणी करणाऱ्या स्व.ज्ञानेश्वर राऊत यांचे सुपुत्र असलेल्या अवधुत राऊत यांनी पाचपुते यांचे वारसदार विक्रम पाचपुते यांच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. भाजपला कोंडीत पकडून उमेदवारी केलेल्या विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराकडे भाजपच्या राज्य नेतृत्वाने पाठ फिरवली आहे. सर्व्हेत प्रचंड मागे पडलेल्या विक्रम पाचपुते यांची उमेदवारी भाजपने नाकारली होती. पण नाट्यमय घडामोडीमुळे ते उमेदवार झाले, पण त्यांच्या उमेदवारीमुळे बबनराव पाचपुते यांच्या मतांचा गठ्ठा देखील विखुरल्याचे बोलले जात होते.

त्यातच आता राज्यातील भाजप नेतृत्वाशी संबंध असणाऱ्या अवधुत राऊत यांनीही विक्रम पाचपुते यांना विरोध केला असल्याने विक्रम पाचपुते यांची उमेदवारी जनतेतुन नकारात्मक ठरत असल्याचे बोलले जात आहे. श्रीगोंद्यात अटीतटीची चौरंगी लढत असताना, आता भाजप मधील पाचपुते विरोधी गट आणि त्यातच विक्रम पाचपुते यांनी फसवून केलेल्या उमेदवारीमुळे नाराज असलेला भाजपचा कोअर वोटर निर्णयाक ठरणार असल्याने त्यांचे मत कोणाच्या पारड्यात पडणार..? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. एकीकडे आपल्या गावी काष्टी येथे सभा घेऊन जनतेला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाचपुते यांच्या सभेपेक्षा जास्त चर्चा अवधुत राऊत यांनी व्यक्त केलेल्या भावनांची होताना दिसत आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…
