दिनांक १३ जुलै २०२६, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सूत्रे हाती घेतल्यापासून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत तालुक्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे संकेत दिले होते. शहरातील वाहतुकीची शिस्त लावण्यापासून ते रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यापर्यंत संजय ठेंगे यांनी दाखवलेली तत्परता पाहून सामान्य नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता.
मात्र, अल्पावधीतच आता हे सर्व चित्र बदलताना दिसत असून, शहरात पुन्हा एकदा अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. एका बाजूला संजय ठेंगे यांची ‘दबंग’ प्रतिमा असतानाच, दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू झालेले मटक्याचे अड्डे आणि बिंगोच्या जोमाने सुरू असलेल्या खेळाने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी, विशेषतः स्टँड परिसर, बनकर कॉम्प्लेक्सच्या शेजारी आणि खाटिक गल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर माळवे ज्वेलर्सच्या शेजारी पुन्हा एकदा मटक्याचे अड्डे आणि बिंगोचे खेळ खुलेआम सुरू झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच pi ठेंगे यांनी ज्या पद्धतीचा धडाका लावला होता, त्यानंतर हे अवैध धंदे भूमिगत झाले होते. परंतु, आता ते पुन्हा जोमाने फोफावत असल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दबंग पोलीस निरीक्षक म्हणून ओळख निर्माण करणारे संजय ठेंगे हे या धंद्यांकडे दुर्लक्ष करत आहेत की, यामागे काही ‘अर्थपूर्ण’ तडजोड झाली आहे? असा प्रश्न आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत.
प्रशासन आणि पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय शहराच्या मुख्य ठिकाणी हे अवैध धंदे सुरू राहणे अशक्य आहे. मग, मटका चालकांना कुणी अभय दिले आहे?
मटक्यासोबतच बिंगो खेळामुळे शहरातील तरुण पिढी उद्ध्वस्त होत असूनही पोलीस प्रशासनाचे कानाडोळा करण्याचे कारण काय?

जो अधिकारी गुन्हेगारांचा कर्दनकाळ मानला जात होता, तोच अधिकारी आता या अवैध धंद्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष का करत आहे? या धंद्यांमधून मिळणारा हप्ता ठरला आहे का? अशी चर्चा आता सर्वसामान्यांच्या तोंडी आहे.
“पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पदभार स्वीकारल्यावर शहरात शांतता नांदेल अशी आशा होती. परंतु, ज्या पद्धतीने मटका आणि बिंगोचे अड्डे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत, त्यावरून ‘कायदा’ हा फक्त कागदावरच आहे का, असा प्रश्न पडतो.
आता संजय ठेंगे या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन पुन्हा एकदा कठोर कारवाईचा बडगा उगारणार की, या अवैध धंद्यांच्या मागे असलेल्या मोठ्या शक्तींपुढे आपली मान झुकवणार? याकडे आता संपूर्ण श्रीगोंदा शहराचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
