दिनांक १४ जुलै २०२६, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दोन सख्ख्या भावांसोबत लग्न करून आलेल्या दोन नववधूंनी लग्नानंतर अवघ्या पाचव्या दिवशी संपूर्ण कुटुंबाला जेवणातून विषारी औषध देऊन घरातून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पीडित कुटुंब सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
श्रीगोंदा तालुकयातील ‘चोराची वाडी’ येथील दोन सख्खे भाऊ जे मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात, त्यांचे विवाह छत्तीसगड येथील दोन मुलींशी ठरले होते. हा विवाह जमवण्यासाठी त्यांनी नांदेड येथील एका एजंटची मदत घेतली होती. या विवाहाच्या बदल्यात एजंटला एकूण ५ लाख रुपये देण्याचे ठरले होते.
ठरलेल्या करारानुसार, पीडित कुटुंबाने सुरुवातीला १ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने एजंटला पाठवले. त्यानंतर २३ मे रोजी अत्यंत साध्या आणि वैदिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. विवाह पार पडल्यानंतर ठरलेले उर्वरित ४ लाख रुपये देखील एजंटला रोख स्वरूपात सुपूर्द करण्यात आले होते. दोन्ही भावांनी सुखी संसाराची स्वप्ने पाहत आपल्या पत्नींना घरी आणले होते.
लग्नाचे सुरुवातीचे चार दिवस आनंदात गेले. मात्र, पाचव्या दिवशी दोन्ही नववधूंनी आपला खरा डाव साधला. त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी विषारी औषध मिसळून संपूर्ण कुटुंबाला खायला दिले. जेवण केल्यानंतर घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत गेले. सर्वजण बेशुद्ध झाल्याची खात्री पटल्यानंतर दोन्ही नववधूंनी घरातून गुपचूप पळ काढला.
सकाळी जेव्हा कुटुंबीयांना जाग आली, तेव्हा दोन्ही सुना घरात नसल्याचे आणि स्वतःची प्रकृती बिघडल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळातच आपली फसवणूक झाल्याची जाणीव संपूर्ण कुटुंबाला झाली. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने कुटुंबाचा जीव थोडक्यात वाचला आहे.
स्रोत:(ऑनलाइन वृत्त)
