दिनांक १४ जुलै २०२६,श्रीगोंदा:
तालुक्यातील मौजे पिसोरेखांड येथील गट नंबर २२५ मधील जमिनीच्या सातबारा उताऱ्यात परस्पर फेरफार करून वडिलांचे नाव खोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अर्जदाराला गंभीर दुखापतीची धमकी देण्यात आली आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या अर्जदाराने संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, न्याय न मिळाल्यास २० जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
अर्जदार शिवाजी आण्णा गावडे (रा. पिसोरेखांड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या गट नंबर २२५ च्या सातबारा उताऱ्यात राजेंद्र भिवसेन श्रीराम याने तलाठ्याला हाताशी धरून परस्पर फेरफार केला आणि वडिलांचे नाव काढून टाकले. या विरोधात शिवाजी गावडे यांनी कलम १५५ अन्वये तहसील कार्यालयात दुरुस्तीसाठी अर्ज केला आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवाजी गावडे आपल्या शेतात गेले असता, राजेंद्र श्रीराम याने त्यांना अडवले. “तू इकडे येऊ नकोस, नाहीतर तुझे तंगडे तोडीन. तुझ्या वडिलांच्या नावाचा उतारा तलाठ्याला हाताशी धरून मीच खोडला आहे आणि तो पुन्हा तुझ्या नावावर होऊ देणार नाही,” अशी उघड धमकी दिली. इतकेच नव्हे तर, “मी त्यासाठी वकील लावला असून ही जमीन माझ्या नावावर करून मी तिथे गाळपेर करणार आहे,” असे म्हणत राजेंद्र श्रीराम याने गावडे यांना धमकावले आहे.
कोणतेही कायदेशीर आदेश किंवा फेरफार नसताना शासकीय दस्तऐवजात छेडछाड करण्यात आल्याने गावडे कुटुंब दहशतीखाली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवाजी गावडे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षक श्रीगोंदा यांच्याकडे केली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई न केल्यास, दिनांक २० जुलै २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान होणाऱ्या कोणत्याही परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा अर्जदार शिवाजी गावडे यांनी दिला आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
