दिनांक २७ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:
श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

या कार्यक्रमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ‘साखर पेरणी’ झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील मूळचे पेडगाव येथील रहिवाशी आणि श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी सोमवारी श्रीगोंदा शहरातील रत्नकमल मंगल कार्यालयात जनतेसाठी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते.

आमदार ओगले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी विविध पक्षांचे पदाधिकारी, मान्यवर मंडळी, प्रशासकीय अधिकारी, सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, व्यापारी तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची गोडी या कार्यक्रमात पाहण्यास मिळाल्याने, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर श्रीगोंद्यातील राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे.

दिवाळी फराळाच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांच्या झालेल्या गाठीभेटींमुळे ‘ऑक्टोबर हिट’मध्ये राजकीय वातावरण तापताना दिसले. आमदार ओगले यांचे सर्व जुने-नवे सहकारी यावेळी सक्रिय सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना आमदार ओगले यांनी सर्व नागरिकांना दिवाळी, पाडवा आणि भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. “भविष्यात आपण सर्व एकत्रित मिळून श्रीगोंदाचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सणांच्या उत्साहात लोकांशी संवाद साधणे ही आमच्यासाठी एक आनंदाची संधी आहे,” असेही त्यांनी सांगितले.

दिवाळी फराळाच्या या गोडधोड कार्यक्रमासोबतच राजकारणातील आगामी समीकरणांवरही चर्चेचा फड रंगला होता. दिवाळीच्या शुभेच्छा देत उपस्थित पाहुण्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. या सर्वपक्षीय उपस्थितीमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
