महाराणी येसुबाई (राजमाता राजाऊ) साहेबांची जयंती २७ जुलै रोजी तर पुण्यतिथी २१ डिसेंबर रोजी साजरी करावी – लक्ष्मीकांत राजे शिर्के..

दिनांक २६ जुलै २०२५, श्रीगोंदा:

स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराजे शिर्के यांच्या धाकल्या राजकन्या, स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के यांच्या लाडक्या बहिणाबाई युवराज्ञी राजाऊ उर्फ जिऊ, राष्ट्रमाता जिजाऊंच्या नातसुन, शिवस्नुषा, स्वराज्याच्या कुलमुखत्यार, शंभुपत्नी महाराणी साहेब अर्थात छत्रपती थोरल्या शाहूराजांच्या राजमाता येसूबाई साहेबांची जयंती अवघ्या महाराष्ट्रभर साजरी होणे अपेक्षित असून पुण्यतिथिचेही स्मरण झाले पाहिजे.

जयंती व पुण्यतिथि निमित्ताच्या माध्यमातून स्वराज्यरक्षिका छत्रपती महाराणी येसूबाईंच्या कर्तृत्वाचा, त्यागाचा दुर्लक्षित वास्तव इतिहास जगाला माहित होऊन समाजाला आदर्शवत ठरण्यास मदत होईल. परंतु दुर्दैवाने हे आजपर्यंत शक्य झाले नाही. कारण कोणत्याही जुन्या नव्या ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या, बखरी अथवा पुस्तकांमध्ये येसूबाईंच्या जन्म तसेच मृत्यूची नोंद सापडत नाही. आणि ही नोंद नसल्याची सल सर्वांच्या मनाला दुःख देऊन जाते. याबाबत काही लेखक, ज्येष्ठ इतिहास तज्ञ, इतिहास अभ्यासकांशी सविस्तर चर्चा केली असता त्यांच्याही बोलण्यातून असे येते की, महाराणी येसूबाईंच्या जीवनातील अनेक महत्वाच्या घटनांच्या तिथी अथवा तारखा अजून सापडल्या नाहीत, जेव्हा सापडतील तेव्हाच जयंती व स्मरण दिन कार्यक्रम करावे लागतील असे उत्तर मिळत आहे.

परंतु या आधुनिक वेगवान प्रगत जगात अशा तोटक्या उत्तराने आमचे व आम्हा समस्त शिव-शंभुभक्तांचे समाधान होत नाही. म्हणून संंबधित विषयावर गांभीर्याने विचार करून जयंती, पुण्यतिथीच्या तारखा निश्चित करणे गरजेचे आहे. आता थांबून चालणार नाही, आजपर्यंत इतिहासात माती आणि लेखनात काड्या करणाऱ्या काही कट- कारस्थानी लेखक, बखरकार, लोकांचे मनसुबे हाणून पाडले पाहिजेत. काही बुद्धिभ्रष्ट लेखकांसह स्वयंघोषित इतिहास अभ्यासक मंडळींनी आजपर्यंत जयंती व पुण्यतिथिची तारीख शोधली नाही आणि शोधण्याचीही तस्दी घेतली नाही. परंतु, त्यांनी येसुबाईंचे आवर्जुन अटक दिन, सुटका दिनाच्या तारखा शोधून पुस्तकात लिहिल्या आणि त्या वेदनादायी वाईट दिवसांचे स्मरण करताना ही वृत्ती दिसत आहे. यात अन्य समाजाला ही गुंतवू पहात आहेत. अशाप्रकारे वास्तव, खरा इतिहास लपवु पाहणाऱ्या लोकांच्या विचारांना बळी न पड़ता आता जयंती साजरी करण्यासाठी शिव-शंभु भक्तांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

ज्याप्रमाणे महाराणी ताराराणी यांच्या मृत्यूचा कुठेच उल्लेख सापडत नसल्याने सर्व मोहिते मंडळी व सरसेनापती हंबीरराव घराण्याच्या वंशजांनी एकत्र येऊन, महाराणी ताराराणी यांच्या पुण्यतिथिची डिसेंबर महिन्यातील एक तारीख ठरवली. अगदी त्याप्रमाणेच आम्ही स्वतः ऐतिहासिक राजेशिर्के (येसुबाई) वंशज घराणे, तसेच राज्यातील अन्य समस्त शिर्के घराण्यातील मान्यवरांसह तमाम शिव-शंभुभक्तांना विचारात घेऊन, एकत्र येऊन महाराणी येसुबाई यांच्या जयंतीची तारीख व पुण्यतिथि तारीख जाहीर करणार आहोत. त्यानंतर अवघ्या राज्यभर येसुबाई जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम झाले पाहिजेत. विशेष करून येसुबाईंच्या मूळ जन्मगावी म्हणजेच कोकणातील “शृंगारपुर” या राजे शिर्क्यांच्या राजधानीच्या ठिकाणी (जयंती) भव्य जन्मोत्सव तर सातारा जवळील असणाऱ्या संगम माहुली येथील समाधी स्थळी स्मृति दीन (पुण्यतिथी) आयोजित करून महाराणी येसुबाईंचे (राजमाता राजाऊंचे) स्मरण केले पाहिजे.

मी स्वतः लक्ष्मीकांत राजे शिर्के वंशज यानात्याने सर्व जेष्ठ लेखक, इतिहास अभ्यासक, पत्रकार, शिर्के मंडळी, शिव-शंभुभक्त यांच्याशी चर्चा केली असून करत आहे. सर्वांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यानुसार आम्ही आमच्या घरामध्ये बरेच वर्षांपासून महाराणी येसुबाई साहेबांची जयंती २७ जुलै रोजी व पुण्यतिथी २१ डिसेंबर रोजी घरगुती पद्धतीने आयोजन करत असतो. तीच तारीख आम्ही जाहिर करत असून घरात होणारी जयंती व पुण्यतिथि सार्वजनिक स्वरूपात करणार आहोत. तरी या पवित्र कार्यात सर्वांनी सहभाग घेत आपल्या घरात, कार्यालयात, वार्डात, वाडीवर, वस्तीवर, गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यभर श्रींची इच्छा समजून (येसुबाई जयंती २७ जुलै रोजी) तसेच (येसुबाई पुण्यतिथी २१ डिसेंबर रोजी) साजरी करावी ही विनंती. येसुबाईंचे छायाचित्र अधिकृत करणे व शालेय स्तरावर जयंती साजरी होण्याकामी आपण लवकरच राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत.

महाराणी येसुबाईंचा फोटो वंशज घराण्यांनी अधिकृत केलेला व समाजमान्य झालेलाच फोटो वापरावा, सोबत फोटो जोडत आहे. जयंती व पुण्यतिथी तारखा निश्चित करणेकामी आमचे राजेशिर्के वंशज घराणे, शिर्के घराणे कोअर कमिटी, स्वराज्यनिष्ठ श्रीमंत पिलाजीराजे शिर्के प्रतिष्ठाण, शंभुसेना प्रणित राजाऊ रेजिमेंट संघटना, स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के स्मृती समिती, महाराणी श्रीमंत येसुबाई साहेब सेवा फाऊँडेशन, महाराष्ट्र राज्य गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट, ऐतिहासिक वंशज घराणे संघटन, राजेशिर्के घराणे संघटन, इतिहास अभ्यासक, लेखक, इतिहास समिती, आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.

स्रोत: श्रीमंत लक्ष्मीकांत राजे शिर्के (व्याख्याते)
(एम.ए. (हिस्ट्री) बी.एड.)
(पत्रकार तथा इतिहास अभ्यासक)
धर्मवीरगड (बहादुरगड) महात्म्य वक्ता

वंशज– महाराणी येसुबाई (राजमाता राजाऊ) तथा स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे पिलाजीराजे शिर्के.. मौजे पेडगाव, किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) तालुका- श्रीगोंदा, जिल्हा- अहिल्यानगर पिन – ४१३७०१
संपर्क – ९६२३६८४८९८..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading