दिनांक २० जुन २०२५,श्रीगोंदा:
मौजे पेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील ऐतिहासिक किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) येथे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी दिनांक १६ जून रोजी अभिमानपूर्वक भेट देत छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यस्थळाचे पूजन करून अभिवादन केले. गडावरील तेजस्वी इतिहासाची माहिती घेत, शौर्यस्थळाच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या स्थानिकांच्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले.

या भेटीत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा शिव. सिमा बोके, उपाध्यक्षा डॉ. अश्विनी देवके, कार्याध्यक्षा राजश्री शितोळे, सहसंघटक डॉ. कल्पना ठुबे, अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षा अॅड. स्वाती जाधव व जिल्हा उपाध्यक्षा अलका पवार या मान्यवर महिला पदाधिकारी सहभागी होत्या. या सर्वांचे पेडगाव येथील राजेशिर्के वंशज घराण्याच्या वतीने स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी महाराणी येसुबाई साहेब व श्रीमंत गणोजीराजे पिलाजीराजे शिर्के यांचे वंशज श्रीमंत लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी धर्मवीरगडाचा दुर्लक्षित प्राचीन इतिहास, पुरातन वास्तू, मंदिरे, तसेच १५ फेब्रुवारी १६८९ रोजी गडावर घडलेला छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्यपूर्ण इतिहास याचे सविस्तर विवेचन केले. विशेषतः येसूबाईंच्या सांगण्यानुसार त्यांच्या माहेरच्या शृंगारपूर राजेशिर्के घराण्याने संभाजीराजांना सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची गौरवगाथाही सांगितली.

भेटीदरम्यान जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने किल्ले धर्मवीरगडाचा विकास, “शंभूसृष्टी”ची उभारणी व छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचे स्मारक साकारण्यासाठी राज्य सरकार दरबारी पाठपुरावा केला जाईल, अशी ठाम भूमिका प्रदेशाध्यक्षा सिमा बोके व जिल्हा अध्यक्षा अॅड. स्वाती जाधव यांनी मांडली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise…
