दिनांक १८ जुन २०२५, अहिल्यानगर:
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि प्रलंबित गुन्ह्यांची वेळेत निर्गती सुनिश्चित करण्यासाठी दि. १७ जून रोजी पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी सहभागी होते.

या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात दाखल असलेल्या सर्व प्रलंबित गुन्ह्यांचा तात्काळ योग्य तपास करून त्यांची निर्गती करण्यात यावी, तसेच पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या. विशेषत: शरिराविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर भर देण्यात आला आहे.

याशिवाय, अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे — जसे की अवैध गुटखा, सुगंधी तंबाखू, गोमांस विक्री, अवैध दारू, गांजा, ड्रग्स विक्री, अवैध वाळू किंवा गौण खनिज उपसा व विक्री, अवैध हत्यार विक्री व बाळगणे, पेट्रोलियम पदार्थांची बेकायदेशीर विक्री, वाहतूक, जुगार/बिंगो/ऑनलाईन जुगार, वाहन चोरी, अनैतिक मानवी तस्करी, पिटा व इतर — हे पूर्णतः बंद करण्यात यावेत याबाबत सक्त आदेश देण्यात आले.

पोलीस अधीक्षक घार्गे यांनी यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली असून, हे पथक वेळोवेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून कोणतेही अवैध कार्य निदर्शनास आल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना कायदेशीर व्यवसायासाठी प्रवृत्त करणे, सराईत गुन्हेगारांवर वैयक्तिक लक्ष घालून कठोर कायदेशीर कारवाई करणे, आणि पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू होणार नाहीत, यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कशी होते, याचा आढावा मासिक गुन्हे आढावा बैठकीत वैयक्तिकरित्या घेतला जाईल, असेही सूचित करण्यात आले आहे. विशेष पथक कार्यरत असून अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी जिल्हा पोलीस सज्ज असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
