तालुक्यातील वाळू तस्करीबाबत तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मंडळ अधिकारी, गाव तलाठी, पोलीस पाटील, बीट अंमलदार, ग्रामसेवक आंधळ्याचे सोंग घेऊन मुकबधीर का झालेत…?

दिनांक ८ मार्च(पेडगाव, श्रीगोंदा):

तालुक्यातील नदी पात्र असलेल्या गावांमध्ये वाळू तस्करी, वाळू माफिया, अवैध गौण खनिज उत्खनन करणारी यंत्रणा हे काय सामान्यांसाठी नवीन नाही. भीमा नदी व घोड नदी पात्रात अनधिकृतपणे, स्थानिक प्रशासनाचा कोणताही परवाना न घेता, पर्यावरण संरक्षण कायद्यास मूठमाती देत, खुलेआम कोणाचाही धाक न बाळगता, दिवसाढवळ्या वाळू उपसा करण्याचा प्रकार पेडगावच्या भीमा नदीतून समोर आला आहे.

श्रीगोंदा तहसील कार्यालयाचे तहसीलदार, पेडगाव गावचे तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक, बीट अंमलदार, पोलीस पाटील या सर्वांच्या नाकावर टिच्चून पेडगावमध्ये सरेआम फायबर बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा चालू असणे विशेष बाब आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

श्रीगोंदा तालुका कार्यक्षेत्रात वाळू तस्करी पूर्वी फार मोठ्या प्रमाणात चालू होती. मात्र, श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बऱ्याच प्रमाणात या सर्व प्रक्रियेवर अंकुश आल्याचे दिसते. पण, अपवादात्मक पेडगाव, अजनुज, कौठा, गार, अनगरे अशा दौंड तालुका सीमेवर असलेल्या भीमा नदीपात्रातील गावांमध्ये अजूनही वाळूमाफिया प्रशासनाची तमा न बाळगता गौण खनिज उत्खनन करीत आहेत.

परंतु, या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवत, कारवाईसाठी नेमलेली प्रशासकीय यंत्रणा म्हणजे, गाव तलाठी, सरकल, बीट अंमलदार, पोलीस पाटील, ग्रामसेवक हे सर्व प्रशासकीय पदाधिकारी बघून आंधळे झाल्यासारखे का वागतात ? असा सर्वसामान्यांमध्ये प्रश्न उपस्थित होतोय. जर, यांना या सर्व गोष्टी दिवसाढवळ्या होत असतांना दिसत असतील. तर, हे बघून कानाडोळा करण्याचे कारण मात्र स्पष्ट होतं नाही. किंबहूना प्रशासकीय यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांचा यात आर्थिक दृष्ट्या हात बरबटल्याशिवाय दिवसाढवळ्या खुले आम फायबर बोटींच्या माध्यमातून वाळू चोरी करण्याचे धाडस वाळूमाफिया करणार नाहीत. हे वास्तव सत्य नाकारता येणार नाही.

यामुळे तहसीलदार व पोलीस निरीक्षक श्रीगोंदा यांनी आपल्या यंत्रणेची चौकशी करून, कारवाई करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा कारवाईबाबत तक्रारी करूनही तालुक्यातील वाळू तस्करीबाबत तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मंडळ अधिकारी, गाव तलाठी, पोलीस पाटील, बीट अंमलदार, ग्रामसेवक आंधळ्याचे सोंग घेऊन मुकबधीर का झालेत…? असा सवाल वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना उपस्थित करणे आवश्यक बनले आहे.

स्रोत:(पेडगावात चालू असलेला अवैद्य वाळू उपसा)..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading