दिनांक १० एप्रिल २०२६ श्रीगोंदा,अहिल्यानगर/पुणे:
श्रीगोंदा येथील एका अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या काही काळापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या दोन सराईत आरोपींना पुणे गुन्हे शाखेने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई-पुणे महामार्गावरील वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात दबा धरून बसलेल्या या आरोपींना युनिट दोनच्या पथकाने अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले साई संजय मदने (वय २३, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा), वैभव सुभाष चौधरी (वय २६, रा. काष्टी) हे आहेत.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचे अपहरण करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील संशयित आरोपी मदने आणि चौधरी हे घटनेनंतर फरार झाले होते. विशेष म्हणजे, या आरोपींच्या नावावर श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी आणि मारामारी यांसारखे २० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, हे दोन्ही आरोपी वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात येणार आहेत.
माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने वाकडेवाडी परिसरात सापळा रचला. आरोपी परिसरात येताच पोलिसांनी त्यांना घेरले आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना ताब्यात घेतले.
अटकेनंतर दोन्ही आरोपींची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुणे पोलिसांनी या अटकेची माहिती श्रीगोंदा पोलिसांना दिली असून, अधिक तपासासाठी आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, अंमलदार संजय जाधव, उज्ज्वल मोकाशी, नागनाथ राख आणि ओंकार कुंभार यांच्या समावेश होता.
स्रोत:(ऑनलाइन वृत्त).. टीप:(Ai फोटो चा वापर)
