श्रीगोंद्यात दुध की विष.? बगाडे कॉर्नरवरील दुधात आढळले प्लास्टिक;? अन्न व औषध प्रशासन मलिदा खाऊन सुस्त.. कारभारावर संताप..!

श्रीगोंद्यात दुध की विष? बगाडे कॉर्नरवरील दुधात आढळले प्लास्टिक; अन्न व औषध प्रशासनाच्या सुस्त कारभारावर संताप

श्रीगोंदा | २८ एप्रिल २०२६:

श्रीगोंदा शहरात भेसळयुक्त दुधाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, बगाडे कॉर्नर परिसरात विक्री होणाऱ्या दुधात चक्क प्लास्टिक सदृश्य पदार्थ आणि प्लास्टिकचा उग्र वास येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शहरातील बगाडे कॉर्नर येथे दुध विक्री करणाऱ्या एका चार चाकी गाडीतून एका ग्राहकाने दुध खरेदी केले होते. हे दुध घरी नेऊन तापवले असता, त्यात प्लास्टिकसारख्या गोळ्या जमा झाल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे, या दुधाला प्लास्टिक जळाल्यासारखा उग्र वास येत होता. याबाबत संबंधित दूध विक्रेत्याला जाब विचारला असता, त्याने ग्राहकाला दाद न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकाने हा प्रकार सार्वजनिक केला आहे.

सध्या उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड वाढलेली असताना दुधाची मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेत काही विक्रेते नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे चित्र आहे.

श्रीगोंदा शहरातील अनेक किराणा दुकाने, हॉटेल्स आणि काही डेअऱ्यांमधून विकले जाणारे दूध शुद्ध आहे की त्यात घातक केमिकलचे मिश्रण केले आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे. प्लास्टिक सदृश्य पदार्थ सापडल्याने हे ‘सिंथेटिक दूध’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी यापूर्वीच ‘पनीर भेसळ’ प्रकरणावर राज्याच्या विधानसभेत आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

आमदारांनी विधानसभेत मुद्दा मांडल्यानंतरही स्थानिक पातळीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) जागी झालेली नाही, ही मोठी दुर्दैवी बाब मानली जात आहे. लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेऊनही जर अशा प्रकारे विषारी दुधाची विक्री होत असेल, तर प्रशासनावर कोणाचा वचक आहे? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.

अहिल्यानगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी श्रीगोंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

एफडीएचे अधिकारी केवळ दिवाळीच्या काळात नावापुरती धाडसत्र राबवतात…”कारवाई होते की मलिदा खाऊन प्रकरणे दाबली जातात?” अशी शंका आता नागरिक व्यक्त करत आहेत…अनेक तक्रारी होऊनही ठोस तपासणी अहवाल कधीच समोर येत नसल्याने संशय बळावला आहे.

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात दुधाच्या शुद्धतेची कोणतीही तपासणी होत नसल्याने आता सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या गंभीर प्रकरणाबाबत वरिष्ठ स्तरावर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून पाठपुरावा केला जाणार असल्याचे समजते.

लहान मुले आणि रुग्णांसाठी अमृत मानले जाणारे दूध जर प्लास्टिकयुक्त असेल, तर ही एक मोठी दुर्घटना ठरू शकते. प्रशासनाने तात्काळ बगाडे कॉर्नरसह शहरातील सर्व दुग्ध केंद्रांची तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading