राष्ट्रीय पोषण पंधरवड्यास जिल्ह्यात उत्साहात प्रारंभ

अहिल्यानगर, दि. १३ एप्रिल : महिला व बाल विकास विभागांतर्गत राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२६ ला जिल्ह्यात उत्साहात प्रारंभ झाला असून ९ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व अंगणवाडी केंद्रांमध्ये विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बालकांचे पोषण, मेंदू विकास, खेळावर आधारित शिक्षण व स्क्रीन वेळ कमी करण्याबाबत व्यापक जनजागृतीवर विशेष भर देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्तरावर या पंधरवड्याचे उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्र्यांच्या हस्ते वेबकास्टद्वारे पार पडले. जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्ह्यातील पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.

पंधरवड्याच्या निमित्ताने माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शून्य ते तीन वर्ष वयोगटातील बालकांच्या मेंदू विकासासाठी उत्तेजन, खेळावर आधारित पूर्वशालेय शिक्षण, अंगणवाडी केंद्र सक्षम करण्यासाठी सामुदायिक सहभाग वाढविणे या विषयांवर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच पोषण रॅली, माता-बालक आरोग्य मार्गदर्शन शिबिरे, पोषण आहार प्रात्यक्षिके व गृहभेटीद्वारे पालक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

हा पंधरवडा २३ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून या कालावधीत जिल्हाभर पोषणाबाबत जनजागृती अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात येणार आहे. सर्व स्तरातील नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading