दिनांक १४ मे श्रीगोंदा:
शहरालगत असलेल्या आंबिल ओढ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत वाळू उत्खनन चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक प्रशासन कोरोना प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाय योजनांमध्ये व्यस्त असतांना, लॉकडाऊनचा गैरफायदा घेत, गौणखनिज उत्खनन करणारे वाळू माफिया भीमा, घोड सारखे मोठे नदीपात्र सोडून, आत्ता थेट ओढे, नाले, तलाव यामध्ये आपले नशीब आजमावत आहेत.
साधारण एक ते दीड किलोमीटर ओढ्याचे पात्र उत्खनन करून, अक्षरशः चाळन करण्यात आली आहे. हा उद्योग करणारे श्रीगोंदा शहरातीलच असल्याचे बोलले जात आहे. पूर्वीपासून चालू अनधिकृत धंद्यावर यांनी मोठी माया जमवली असून, स्थानिक प्रशासनासही ते भीक घालत नाहीत. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई त्यांच्या पाचवीलाच पुजली आहे.प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधाने, या वाळू तस्करांना वेळोवेळी अभय मिळत गेले. आत्ता मात्र या नराधमांना प्रशासनाची तसेच पोलिसांची परिणामी कायद्याची भीती राहिली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
श्रीगोंदा शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर गेल्या पंधरवड्यापासून जेसीबी यंत्राच्या साह्याने गौणखनिज उत्खनन केले जात आहे. एकीकडे कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी स्थानिक प्रशासन लोकांच्या संरक्षणार्थ खडे ठाकले असतांना, या संधीचा गैरफायदा घेऊन ओढे-नाले उत्खनन करण्यात वाळू माफियांनी सुरुवात केली. श्रीगोंद्याचे तहसीलदार तथा कोरोणा आपत्तीमध्ये तालुका प्रमुख असलेले महेंद्र माळी हे समाजातील गरिबांची, उपेक्षितांची भूक भागवीत कोरोणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर आहेत. त्यांचे सबंध प्रशासन या प्रक्रियेमध्ये सक्रिय असतांना, या संधीचे सोने करत, काही गैरकायद्याचे लोक आपले हीत साध्य करण्यात गुंतले असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
उत्खनन केलेल्या ठिकाणी वाहतूक गाड्या येण्यासाठी एक मार्ग व जाण्यासाठी एक मार्ग असून, मोठया प्रमाणात वाळू साठवून ठेवलेली आहे. रात्रीच्या अंधारात नमूद वाळू माफिया आंबिल ओढ्यातील पवार वस्तीच्या मागे आपला डाव साधत गौण खनिज वाहतूक करीत आहेत. या प्रकरणी अनेकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, यातील दोन गाड्या प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या असल्या, तरीही राजरोसपणे आजही घोडेगाव रोड नजीक असलेल्या आंबिल ओढ्यामध्ये वाळू उत्खनन करण्यात आले आहे. यावर श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र माळी यांनी कारवाई करावी, अशी मागणी आसपासच्या शेतकऱ्यांकडून होत आहे.
