लोकवर्गणी करून आमदार झालेले पाचपुते आता साम्राज्यवादी बनलेत… संतोष इथापेंचा बबनराव पाचपुते व त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप..

दिनांक ९ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ २२६ मध्ये निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विविध पक्ष आणि संघटनांचे उमेदवार मतदारांच्या विश्वासासाठी संघर्ष करत आहेत. या प्रचारात सामाजिक कार्यकर्ते व राजकीय अभ्यासक श्री संतोष इथापे यांनी पत्रकारांशी संवाद साधत प्रस्थापित राजकारणी आमदार बबनराव पाचपुते आणि त्यांचे सुपुत्र विक्रम पाचपुते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

संतोष इथापे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारसभेत सात तारखेला पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. इथापे यांच्या मते, श्रीगोंदा मतदारसंघातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक यांच्यात भाजपच्या धोरणांबद्दल तीव्र नाराजी आहे. भाजपने दिलेल्या विकासाच्या आश्वासनांचा उल्लेख करून ते म्हणाले की, सरकार सत्तेत आल्यानंतर महागाईचा डोंगर रचला गेला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील विकासकामांमध्ये हजारो कोटींचा निधी येऊनही, त्यातील शेकडो कोटींची टक्केवारी घेण्यासाठी निधी खर्च केल्याचा आरोप इथापेंनी केला. सहा महिन्यांपूर्वीच बांधलेल्या रस्त्यांमध्ये खड्डे पडले आहेत. तालुक्यातील अनेक विकासकामे प्रलंबित असून, पाचपुते यांच्या सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता या समीकरणामुळे तालुक्याचा विकास थांबला असल्याचे इथापे यांनी नमूद केले.

इथापेंनी आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर शहरातील २४ तास पाणी योजना आणि एमआयडीसीबाबत खोटी आश्वासने दिल्याचा आरोप केला. त्याचप्रमाणे नाना-नानी पार्क हे आश्वासनसुद्धा पोकळ असल्याचे सांगितले. कोविड काळात तालुक्यात कोविड सेंटर उभारण्याची गरज असताना, त्याबाबत कोणतीही ठोस पाऊले न उचलण्याचे पाप पाचपुते कुटुंबीयांनी केले असल्याचा आरोपही इथापेंनी केला.

यावेळी इथापे यांनी शेजारील मतदारसंघात खासदार निलेश लंके यांनी कोविड काळात हजारो पेशंट्सची सेवा केली असताना, श्रीगोंद्यात मात्र आमदार आणि त्यांचे सुपुत्र भूमिगत राहिल्याचे सांगितले. रस्त्यांच्या स्थितीबाबत विविध पत्रके प्रसिद्ध करण्यात आली असली तरी, त्या रस्त्यांची दुरवस्था सहा महिन्यातच झाली आहे.

पाचपुते कुटुंबाच्या सत्ताकाळात ३५ वर्षांच्या प्रदीर्घ काळात मूलभूत प्रश्न सोडवण्याची संधी मिळूनही लोकांची स्थिती जैसे थे राहिली आहे, अशी टीका इथापे यांनी केली. लोकवर्गणी करून आमदार झालेले पाचपुते आता साम्राज्यवादी बनले असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या शिक्षण संस्थेत आर्थिक दुर्बलांना मोफत शिक्षण दिले जात नाही, हे पाहता जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर पाचपुते यांना जनतेसमोर जाण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही इथापे यांनी म्हटले.

इथापे यांनी विश्वास व्यक्त केला की, महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांना जनतेचा पाठिंबा मिळेल आणि तालुक्यातील ३५ वर्षांचा विकास बॅकलॉग भरून काढण्यासाठी त्या निश्चित विजयी होतील.

स्रोत:(मुलाखत)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading