राजेंद्र नागवडे यांची विरोधकांवर टीका.. “शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्यांकडून विकास अपेक्षित नाही”..

दिनांक ९ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

“ज्यांनी वर्षानुवर्ष शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकवले, आणि ज्यांच्यावर तब्बल ३० गुन्हे दाखल आहेत, ते आमदार होऊन काय विकास करणार?” असा सवाल सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी उपस्थित केला आहे. सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत, नागवडे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

नागवडे म्हणाले की, नागवडे साखर कारखाना गेल्या ५० वर्षांपासून सलग गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडत आहे. यासोबतच, महाविकास आघाडी उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा सहकारी बँक यांसारख्या विविध ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. याउलट, विरोधी उमेदवारांनी साखर क्षेत्रात किंवा तालुक्याच्या विकासात काहीही ठोस कार्य केलेले नाही, असे नागवडे यांनी ठामपणे सांगितले.

राजेंद्र नागवडे यांनी भाजप उमेदवारांवरही टीका करताना, “भाजप उमेदवाराने आपल्या आईची उमेदवारी बदलण्यासाठी प्रयत्न केले आणि स्वतःची उमेदवारी मिळवण्यासाठी पुण्याला जाण्याची धमकी दिली होती. त्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही, आणि २० तारखेला जनता त्यांना थारा न देता पुण्यालाच पाठवेल,” असे वक्तव्य केले.

अपक्ष उमेदवार जगताप यांच्यावर देखील नागवडे यांनी टीकेचा निशाणा साधला. “२०१४ मध्ये आम्ही त्यांना आमदार बनवण्यात पुढाकार घेतला, परंतु २०१९ मध्ये त्यांनी कुकडी सहकारी साखर कारखान्याचे काम उभारण्यासाठी उमेदवारी नाकारली. प्रत्यक्षात, आज कुकडी कारखाना शेतकऱ्यांचे बिलही देऊ शकत नाही, आणि शेतकरी आजही चकरा मारत आहेत,” असे नागवडे यांनी स्पष्ट केले.

“जगताप हे स्व. शिवाजीराव नागवडे यांचा फोटो वापरत आहेत, मात्र नागवडे कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी त्यांच्यासोबत कधीही राजकारण केलेले नाही,” असे सांगून नागवडे यांनी जगताप यांच्यावर कुटुंबीयांच्या फोटोंचा गैरवापर करण्याचा आरोप केला. याशिवाय, “अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे पूर्ण समर्थन असताना, जगताप यांनी खासदार शरद पवार आणि राहुल गांधी यांचे फोटो वापरून जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु जनता त्यांना थारा देणार नाही,” असे नागवडे यांनी ठामपणे सांगितले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading