दिनांक ३० ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा:
८० च्या दशकापासून स्व. शिवाजीराव नागवडे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तसेच साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांना मालक बनवून तालुक्याच्या विकासाचे स्वप्न साकारले. याशिवाय, पाटपाणी योजना आणि शैक्षणिक सुविधा पुरवून तालुका पुढे नेण्याचे त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. परंतु, मागील ४० वर्षांत केवळ घोषणा आणि गलथान कारभारामुळे श्रीगोंदा मतदारसंघात कागदी विकासाचा आभास निर्माण करण्यात आला.

कुकडी प्रकल्पामुळे बागायती क्षेत्रात वाढ झाली असली तरी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते. परिणामी, टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करावा लागतो आणि काही शेतकऱ्यांना बागा मोडाव्या लागल्या आहेत. एमआयडीसीच्या बाबतीत अनेक वेळा योजनांची घोषणाही झाली, परंतु प्रत्यक्षात प्रकल्प कागदावरच राहिला आहे. तालुक्यातील कुशल आणि अकुशल कामगारांना अजूनही रोजगारासाठी नगर, कुरकुंभ, कारेगाव आणि रांजणगाव या ठिकाणी जावे लागते.
साकळाई उपसा जलसिंचन योजना ही अनेक घोषणा आणि सर्व्हे करूनही अद्याप कागदावरच राहिली आहे. यामुळे कोळगाव, चिखली आणि नगर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांमध्ये आजही पाण्याची समस्या आहे. हा दुर्लक्ष झालेला कारभार पाहून मतदारसंघातील जनता आता परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे.
रस्ते दुरुस्तीच्या कामांत कोट्यवधी रुपयांची निविदा काढण्यात आली असली तरी टक्केवारीचा खेळ सुरू राहिला. याचा परिणाम म्हणजे रस्त्यांची दुरवस्था जसाच्या तशी राहिली आहे. पाणी वाटप, विसापूरखालील गावांचा समावेश, वितरिका क्रमांक १०, डिंभे-माणिकडोह बोगदा यांसारख्या प्रलंबित प्रश्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

नगर-दौंड रस्त्यावरील टोल नाक्यावर वाहनचालकांना सवलत देण्यात आली नसल्यानेही मतदारांत रोष वाढला आहे. कोरोना काळातही लोकप्रतिनिधींनी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, परंतु नागवडे परिवाराने पुढाकार घेत कोवीड सेंटर चालवले.
श्रीगोंद्यात अद्ययावत सरकारी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरीकांना अन्यत्र जावे लागते. उपजिल्हा रुग्णालय अद्याप कागदावर आहे. पोलिस ठाण्याची स्थितीही अत्यंत बिकट असून, ब्रिटिशकालीन जुन्या तहसील कार्यालयात कामकाज सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेला विकासाचा लाभ केवळ कागदावरच मिळतो आहे, असा लोकांचा अनुभव आहे.
भाजप पक्षाची प्रतिमा घसरलेली दिसत असून मतदारसंघातील नागवडे कुटुंबाच्या कामाला आता जनतेतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असे राजेंद्रदादा नागवडे यांनी नमूद केले.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)




