दिनांक ८ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले नवशाद मुन्सीलाल शेख, रा. मांडवगण, यांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे. त्यांचे वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हमालीचे काम करत कुटुंबाची जबाबदारी पार पाडत होते. त्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन लहानाचे मोठे केले. नवशाद शेख यांच्यावर त्यांच्या वडिलांचे मोठे संस्कार आहेत आणि त्याचा प्रभाव त्यांच्या सामाजिक कार्यात दिसून येतो.
गावातील लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत, त्यांच्याशी खांद्याला खांदा लावून नवशाद यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली. त्यांच्या कामाची दखल घेऊन २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा आमदारकीसाठी अर्ज भरला. परंतु, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव त्यांच्यासाठी एक धडा होता, मात्र त्यांनी हार मानली नाही. यानंतरही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले आणि गावकऱ्यांमध्ये त्यांचा विश्वास जिंकला.
श्रीगोंदा तालुक्यातील ३० ते ३५ गावांत सातत्याने पडणारा दुष्काळ, पाणीपुरवठा आणि शेतीचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने नवशाद शेख यांनी भीमा उपसा योजना व साकळाई योजनेसाठी अथक प्रयत्न केले. या भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले, मात्र स्थानिक नेते या समस्यांना गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाची सुरुवात करत लोकसभेची निवडणूकही लढवली, परंतु त्यातही त्यांना अपयश आले.
आज नवशाद शेख पुन्हा एकदा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. तालुक्यातील जनतेने त्यांना भरभरून प्रतिसाद देत त्यांच्या सामाजिक कार्याला मान्यता दिली आहे. त्यांनी केलेले समाजकार्य, गोरगरिबांच्या समस्या हाताळण्याचे धाडस आणि जनकल्याणाच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवावे, अशी जनतेची अपेक्षा आहे.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)




