प्रजापिता सम्राट अशोक (भाग १६)..

युद्धभूमीस भेट

सकाळी सम्राटांनी निवडक सैन्य घेतले आणि रणभूमीकडे निघाला . जळून खाक झालेला कलिंग लांबूनच दिसत होता. जसजसा जवळ येत होता तसतसा प्रेतांचा वास येत होता. आकाशात घारी, गिधाडे घिरट्या घालत होती. तर काही प्रेतांचे लचके तोडत होती. प्रेतांचा नुसता खच पडलेला होता. रणभूमी सारी रक्ताने माखली होती. यात काही जखमी अजूनही विव्हळत पडलेले होते . कोणाचे हात, तर कोणाचे पाय तुटलेले होते . अंगावरील जखमांनी जायबंदी झालेले होते .

https://bit.ly/bspmycityshrigonda

अशा ह्या कठीण परिस्थितीत बौद्ध भिक्खूचे अनेक संघ जागोजागी जखमींची सेवा करीत होते. बौद्ध धम्माची शिकवण या सेवेतून जाणवत होती . सडलेल्या प्रेतांची दुर्गंधी याची त्यांना पर्वा नव्हती . जिवंत असणा – यांना कसे वाचवता येईल यासाठी ते प्रयत्न करताना दिसत होते . पेटलेली घरे अजूनही जळत होती . आकाशात जाणारा धूर त्याची साक्ष देत होता. अशोकाचं मन विदीर्ण झालं . काळजाला इंगळ्या डसल्या. तो मनातच कळवळला , ” हे मी का आणि कशासाठी केले ? ” हा नरसंहार इतका भयानक होता की त्याची कल्पना जरी केली तर माणसाचं काळीज चिरत जातं .

ते पाहून अनेकांना घेरीच येईल. पण कशायवस्त्र परिधान केलेले बौद्ध भिक्खू शांत चितान लोकांची सेवा करत होते . या युद्धात एक लाख लोक मारले गेले. लाखो जखमी झाले. जवळ जवळ दीड ते पावणे दोन लाख लोकांना कैद करण्यात आले होते . हा नरसंहार पाहून सम्राट हादरला . कलिंगची सुंदर आणि संपन्न भूमी बेचिराख झाली होती . काळी ठक्कर झाली होती . स्वच्छ व सुंदर कलिंगनगरी रोगराईने पिडीत झाली होती. अशोकाच्या ( सम्राटाच्या ) मनात प्रश्न उभे राहिले . ” हे मी का केलं ? हा विजय आहे की पराभव आहे ? मी मानव जातीला न्याय दिला की अन्याय केला ? लहान बालकं आणि स्त्रिया यांच्यावर शस्त्र चालवून कोणता पराक्रम केला ? आपल्या साम्राज्यासाठी ? राज्य वैभवासाठी ? दुस – याचं राज्य , वैभव नष्ट करण्यासाठी ? ” अशा अनेक प्रश्नांनी सम्राट सुन्न झाले .

ते रणंगणाची पाहणी करत पुढे जात होते . स्त्रिया आणि मुलांना का मारले त्यांना मारण्याचा घरं जाळण्याचा हा अघोरीपणा सैनिकांनी का केला असे अनेक प्रश्न अशोकाला सतावत होते. ” माझं एक काम कर …. समोरून एक लावण्यवती तरुणी येऊन अशोका समोर उभी राहिली. पाठीवर केस मोकळे सोडलेले . अंगावर मळलेली वस्त्रे , नजर शुन्यात हरवलेली . ती सम्राटाच्या घोड्यापुढे येऊन म्हणाली , ” राजा , तूच सम्राट अशोक ना ? थांब सम्राट , माझं एक काम राहिले आहे ते पूर्ण कर आणि मगच पुढे जा…. ” हं , कलिंगचा नायनाट व संहार करणं हीच तुझी अभिलाषा होती ना ? हा बघ चैत्र (खारवेल) राजाचा वंशज बालकुमार काय तो शिल्लक आहे .

” म्हणून त्या चार- पाच दिवसाच्या लहान बालकास घोड्याच्या दोन टापांच्या मध्ये ठेवून म्हणाली , ” यालाही कशाला शिल्लक ठेवतोस ? उचल शस्त्र आणि घाल घाव. कर त्याचे तुकडे आणि खुशाल राज्य कर ह्या स्मशानभूमीवर. ” ती चढ्या आवाजात खडे बोल बोलत होती. अशोकाच्या मनावर एका एका शब्दाचा वार होत होता. हे जे घडले ते कोणाच्या आज्ञेवरून ? येथील अनेक तरुणींनी आपली कोवळी बाळं छातीशी कवटाळून नदीत उड्या घेतल्या, तर कोणी अग्नीत. ती कर्णकर्कश हसली. ” आता माझा विसावा म्हणजे मरणंच. पण आतापर्यंत मी थांबले ते माझ्या पोटातील गोळा ( मूल ) बाहेर पडेपर्यंत. हे ही तुला अर्पण करते …

” म्हणून मूल घोड्याच्या दोन्ही टापांच्या मध्ये ठेवले . तेव्हा त्या मुक्या प्राण्यालाही त्याची जाणीव झाली आणि आणि घोडा चार पावलं मागे सरला . ” सम्राट, उपस शस्त्र आणि खुपस त्याच्या छातीत . बघ त्याच्या छातीत रक्ताऐवजी दुधाची चिळकांडी उडेल … ” ही दुसरी तिसरी कोणी नसून ती होती कलिंगच्या राजा चैत्र ( खारवेलची ) सून दर्शना . ती मूल सोडून पळत सुटली . पळता पळता म्हणाली , ” मी माझ्या पतीला भेटण्यासाठी जात आहे . त्यांना वीरगती प्राप्त झाली . त्यांना भेटणं माझं कर्तव्य आहे . ” अशोकासह सैनिकांचीही मनं विदर्ण करणारी घटना होती . ” भगिनी दर्शना , थांब …. ” ते कोवळे बाळ रडू लागले. अशोकाचं मन कळवळलं. त्यांना त्यांच्या बालकांची आठवण झाली . अशोकांनी ताबडतोब त्या मुलाला उचलायला सांगितले आणि दर्शनाची व्यवस्था करायला सांगितले . तेव्हा सेनापती म्हणाला , ” हा शत्रुचा मुलगा उद्या मोठा झाला की …

” ” होऊ दे आणि माझ्या कृत्यावर क्रूरपणे घाव घालू दे . जा अगोदर , जे सांगतो ते करा . ” दर्शनाची व तिच्या मुलाची व्यवस्था दर्शनाच्या भावाकडे करण्यात आली . अशोकाला सम्राटपद बोचत होते . साऱ्या कलिंगचं चित्र डोळ्यापुढे दिसत होतं . झोप उडाली. मन बेचैन झालं. सुन्न झालं. आपण हे काय करून बसलो. रात्रंदिवस अशोक आपल्या महालात सारख्या येरझाऱ्या घालत होता. जीवाची घालमेल होत होती. अन्नावरची वासना उडाली होती. कलिंगच्या जनतेवर आपण घोर अन्याय केला याची बोचणी अशोकाला लागून राहिली.

वार करून गावं माणसं बेचिराक करणारे हात कुठे आणि काशायवस्त्र धारण करून मानवाची सेवा करणारे हात कुठे. याचा तो विचार करू लागला. विदिशाचं म्हणणं मी का विसरलो ? दर्शना अशोकाच्या समोर दिसत होती. तशी सुसीमची पत्नी अशोकाची वहिनी शिलावती डोळ्यासमोर येत होती. तिच्या पोटातील अंकुर आता जन्मास येऊन मोठा झाला असेल या विचारात असतानाच शेजारच्या बुद्ध विहारातून घंटेचा आवाज आला आणि शांत वातावरण ” बुद्धं सरणं गच्छामि धम्मसरणं गच्छामि सघं सरणं गच्छामि शब्द कानी पडले . ते स्वर अशोकाला जरा बरे वाटले . पण नंतर आहे त्याच वातावरणात अशोकाने सगळ्यांना भेटण्याची परवानगी नाकारली तरी असंधिमित्रा हिला अशोकाने खुणेनेच बाहेर पाठवले तर पद्मावतीवर एकदम चिडले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

अशोकाचा स्वभाव चिडचिडा झाला . मनाला कसली शांतता तर नाहीच . अनेक राजवैद्यांनी औषधाच्या मात्रा दिल्या. पण काही उपयोग होत नव्हता. मनाला झालेल्या जखमा बाह्य औषधाने कशा बरे बऱ्या होणार?

क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading