प्रजापिता सम्राट अशोक (भाग २४).

वास्तुकला आणि शिल्पकला

सम्राट अशोकाच्या काळात अनेक कलांना राजाश्रय मिळाला व निरनिराळ्या कलांच विकास झाला. त्यात शिलालेख, स्तंभलेख व गुहालेख यांना फार महत्त्वाचे स्थान देण्यात आले. त्यांच्या मनाचे प्रतिबिंब या कार्यात दिसते. ह्या अमर इतिहासाच्या प्राचीन खुणा आहेत. अशोकाचे महान जिवितकार्य आजही घडविलेल्या अद्भूत शिल्पांच्या रूपाने अमर राहिले आहे. दगडातून कोरलेले शिलालेख, स्तंभलेख आणि गुहालेख ही अशोकाची जिवंत खरीखुरी स्मारके आजही तग धरून आहेत.

https://bit.ly/bspmycityshrigonda

प्राचीन भारतीय संस्कृतीचा अत्यंत मोलाचा हा ठेवा मानवास अनंत काळपर्यंत प्रेरणा देत राहील . सद्भावनेच्या विचारांचा अनमोल असा वारसा आहे . हे लेख ब्राह्मी व खारोष्टी भाषेत हा लिहिले गेले आहेत. सम्राट अशोक स्वतःस देवाना प्रिय, प्रियदर्शी म्हणवून घेत असे. या सर्व लेखांतून प्रियदर्शी राजाने आपल्या प्रजेसाठी काय काय केले आणि प्रजेने धम्मासाठी कसे वागावे याची शिकवण दिली आहे.

या प्रियदर्शी राजाने आपल्या कर्तबगार अधिकाऱ्यांनाही काही आज्ञापत्रे लिहून ठेवली आहेत. आई, वडील, मित्र, अधिकारी, प्रजा यांना मार्गदर्शन करणारे लेख रस्त्यावरून जाणाऱ्या – येणाऱ्या लोकांना दिसावेत, कळावेत म्हणून, मुद्दाम तीर्थयात्रेच्या वाटेवर सोप्या भाषेत कोरून ठेवले आहेत. अशोकांनी सातव्या शिलालेखात म्हटले आहे की देवाना प्रिय प्रियदर्शी राजाची इच्छा आहे की सर्व पंथांच्या लोकांनी राज्यात आनंदाने नांदावे कारण संयम आणि चित्तशुद्धी असावी असे सारे पंथ सांगतात.

माणसाचा कल आणि श्रद्धा हर तऱ्हेची असते. त्याच्या हातून आपले सर्व कर्म पूर्ण होईल अगर त्या कर्माचा काही भाग होईल परंतु त्याला संयम, मनःशुद्धी आणि योग्य कार्य ह्याचे ज्ञान असले पाहिजे. तसे नसेल तर त्याच्या दातृत्त्व व धर्मश्रद्धा मग ती कितीही मोठ्या प्रमाणात असली तरी कवडीमोल आहेत. त्याने सद्विचारांची भक्ती आणि सर्वधर्माचा आदर केला म्हणून तो सर्वमान्य झाला. विशेषतः त्याच्या चौदा आज्ञा म्हणून प्रसिद्ध आहेत. गिरीलेख देशाच्या चारही भागात आढळतात. उदा. पेशावरजवळ शहाबाझगढी येथे, ठाणे जिल्ह्यात सोपारा गावी, काठेवाड जिल्ह्यात गिरनार या ठिकाणी, ओरिसा प्रांतात जगन्नाथपुरीजवळ, घौली या गावी, दक्षिणेस गंजम जिल्ह्यात जौगाडा येथे ह्या आज्ञा पाहावयास मिळतात.

अशोकांनी लिहिलेले एकूण चौतीस शिलालेख सापडले आहेत. खडक मिळाले नाहीत तेथे एक भव्य स्तंभ सुमारे ५० फूट उंचीचे व त्याचे वजन ५० टन असावे असा तज्ञांचा अंदाज आहे. अखंड पाषाणातून हे स्तंभ उभे केलेले आढळतात. इतके मोठे पाषाण असूनही त्याचे काम ओबडधोबड नाही. ते इतके घोटीव व गुळगुळीत आहेत की त्यात तोंड पाहून घ्यावे. त्यावरील खोदकामाची कुशलता व प्रमाणशीलता पाहण्यासारखी आहे.

सारनाथजवळ असलेल्या स्तंभाच्या तळाचा भाग घंटेसारखा असून त्याला कमळाच्या पाकळ्यांचा आकार आणलेला आहे. मधल्या बाजूस पुष्ट बैलाचे चित्र आहे. वाटोळ्या दगडावर चार दिशांना अजस्त्र आकाराचे चार सिह मधल्या बाजूने चिकटून उभे आहेत. सर जॉन मार्शल या शिल्पशास्त्रज्ञाने या स्तंभाची फारच स्तुती केली आहे. हे अशोकचिन्ह सर्वग्राहक गतीमान गोधनधिष्ठित आणि सार्वभौम राज्यसत्तेचे निदर्शक असल्यामुळे आपल्या स्वतंत्र भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकारली आहे. स्तंभाप्रमाणे त्यांनी अनेक मोठेमोठे स्तूप जागोजागी उभे केले. या सर्वात सांची येथील स्तूप फार प्राचीन व प्रख्यात आहे. अर्धवर्तुळाकार स्तूप हा एका विस्तृत गच्चीमध्ये वर्तुळाकार आहे. त्याची उंची ५४ फूट आहे. अशोकाच्या काळात कोठवाड येथील तुशास्य नावाच्या पारसिक (इराणी) प्रांताधिका – याने गिरनार पर्वताजवळ नद्यांचे प्रवाह अडवून सुदर्शन नावाचा मोठा तलाव बांधला. तेथून निर्जल भागात पाणीपुरवठा करण्यासाठी कालवे काढून पाणी पोहचवण्याची व्यवस्था केली.

याच काळात काश्मीरची राजधानी श्रीनगर व नेपाळमधील देवपाटण ही शहरे अशोकानेच वसविली. सांची येथील स्तूप बांधण्यास अशोकाला प्रेरणा दिली ती विदिशाने. सारनाथ येथे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिले धम्मचक्रप्रवर्तन केले त्या ठिकाणी एक विहार बांधण्यात आले. गया येथे गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तेथे शिलास्तंभ उभारला व त्यावर लेख कोरला गेला. लुंबिनी गावात गौतम बुद्धांचा जन्म ज्या उद्यानात झाला, लहानाचे मोठे झाले व गृहत्याग केला, त्याच भागात लोकांना ज्ञान दिले.

या भागात अशोकाने मनोभावे फिरून माहिती करून घेतली. वैशाखी पौर्णिमेला खास करून महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. ते म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला. ज्ञानप्राप्ती वैशाखी पौर्णिमेला झाली आणि महापरिनिर्वाणही वैशाखी पौर्णिमेलाच झाले. अशोकाने या भागात अनेक स्मारके बनविली. अनेक स्तूप बांधले. ते आजही आपणास प्रेरणा देतात ही आदर्श मान चिन्ह आहेत याचे जतन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.

क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)

Leave a Reply