दिनांक १७ जानेवारी २०२५, बीड जिल्हा | केज तालुका | मस्साजोग ग्रामपंचायत:
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच कै. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, राजकीय वैमनस्यातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

आज मढेवडगावचे लोकनियुक्त सरपंच श्री. प्रमोद शिंदे, उपसरपंच श्री. राहुल साळवे, ग्रामपंचायत सदस्य श्री. योगेश तात्या शिंदे, श्री. अभिजित शिंदे आणि श्री. बाळासाहेब फापाळे यांनी देशमुख कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले. त्यांनी या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत देशमुख कुटुंबीयांना धीर दिला.

प्रथमदर्शनी, ही घटना राजकीय वैमनस्यातून घडल्याचे स्पष्ट होत असून, ती लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत असल्याने, प्रामाणिक व चांगल्या लोकांचा राजकारणातील सहभाग कमी होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन आरोपींना अटक करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जावी, ही जनतेची एकमुखी मागणी आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. सहकार महर्षी श्री शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकार साखर कारखान्याचे चेअरमन श्री. राजेंद्र दादा नागवडे मित्र परिवाराच्या वतीने संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राजकीय हत्याकांड थांबवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. लोकशाही ही जनतेचा विश्वास व अधिकार टिकवणारी प्रणाली आहे. त्यामुळे अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कडक कारवाई होणे गरजेचे आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, हीच सर्वांनी मागणी केली आहे.
स्रोत:(राहुल साळवे)

जाहिरात..
