दिनांक ३० जून २०२६, श्रीगोंदा:
पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील एका सराईत आरोपीला श्रीगोंदा शहरात अत्यंत शिताफीने अटक करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलीस आणि श्रीगोंदा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत वेशांतर करून या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे (BNS कलम ३०५(अ), ३३१(४)) आणि (BNS कलम ३०५(अ), ३३१(४)) नुसार घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अमीर शिंदे (रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) हा श्रीगोंदा परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती विश्रांतवाडी पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली होती.
माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांचे पथक तात्काळ श्रीगोंदा येथे दाखल झाले. स्थानिक श्रीगोंदा पोलीस स्टेशनची मदत घेऊन, आरोपीला संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी वेशांतर केले आणि परिसरात सापळा रचला. अत्यंत गुप्तता पाळून आरोपी अमीर शिंदे याला ताब्यात घेण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ. विशाल गाडे, संजय बादरे, पो.कॉ. प्रमोद जाधव, किशोर भुसारे तसेच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पो.ना. गहिनीनाथ यादव, पो.कॉ. संदीप राऊत, विवेक दळवी आणि मयुर तोरडमल यांनी मोलाची भूमिका बजावली. पुढील तपासासाठी आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
