‘डिफेन्स क्लस्टर’च्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्याचा जलद विकास – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील.. महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा..

दिनांक १ मे २०२६ अहिल्यानगर:

अहिल्यानगर जिल्हा आता ‘डिफेन्स क्लस्टर’च्या माध्यमातून वेगाने विकसित होत असून, जिल्ह्यात नौदलाच्या संदर्भातील ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग’ प्रकल्प उभा राहत आहे. संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून, यामुळे जिल्ह्यातील युवकांना स्थानिक पातळीवरच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य मिळेल,” असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

  महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त अहिल्यानगर येथील पोलीस कवायत मैदानावर डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर ज्योती गाडे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, १ मे १९६० रोजी आपल्या राज्याच्या निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्यांच्या प्रति राज्य शासन कृतज्ञ आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन राज्याची प्रगतीची घोडदौड सुरू आहे. आज कामगार दिन असून सर्व कष्टकरी बांधवांच्या योगदानाचाही त्यांनी गौरव केला.

“२०२७ ची जनगणना ही स्वातंत्र्योत्तर पहिलीच ‘डिजिटल’ जनगणना असून नागरिकांनी ‘स्वगणना’ सुविधेचा लाभ घेऊन आपली अचूक माहिती नोंदवावी. ही प्रक्रिया देशाच्या विकासाची पुढील दिशा ठरवणारी असेल.” तसेच ‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्याच्या विकासाचा आराखडा मांडताना डॉ. विखे पाटील यांनी ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेवर भर दिला. ते म्हणाले, “२०४७ च्या विकसित भारताच्या संकल्पासोबतच ‘विकसित महाराष्ट्र’ घडवणे हे आमचे ध्येय आहे. राज्याची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलरपर्यंत नेऊन देशाला विकासाची दिशा देणारे महाराष्ट्र हे देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य ठरेल.” यासोबतच आरोग्य सुविधा आणि कौशल्य विकासामध्येही आपला जिल्हा उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण व जलसंवर्धनाचा उल्लेख करताना त्यांनी ‘गोदा ते नर्मदा दर्शन जलयात्रा’ उपक्रमाची माहिती दिली. हजारो महिलांच्या सहभागातून गोदावरीच्या पवित्र जलाचे व मातीचे पूजन करून पाणी बचतीचा आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी, सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

  मुख्य ध्वजारोहणाच्या या सोहळ्यास स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading