दिनांक २१ सप्टेंबर, श्रीगोंदा:
सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे असलेले सब रजिस्टर कार्यालय अनेकदा आरोप- प्रत्यारोपांच्या विळख्यात सापडलेले आहे. जमीन खरेदी विक्री प्रकरणांमध्ये याठिकाणी झालेले अपहार, सामान्यांची झालेली फसवणूक श्रीगोंदेकरांनी अनेकदा अनुभवली आहे.

विनापरवाना, अनधिकृत लोकांचा येथील हस्तक्षेप व दलालांकरवी मोठ्या प्रमाणात चाललेला कारभार या कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण करीत आहे. मागील काही वर्षांपासून सब रजिस्टर कार्यालयात रुजू असलेले पालवे यांची नुकतीच राहुरी येथे बदली झालेली आहे. त्यांची कार्यप्रणाली सर्वांना माहीत आहे.
त्यांच्या जागी राशीनकर यांना नव्याने प्रभारी कार्यभार दिला आहे. मात्र, राशीनकर हे वादातीत अधिकारी असून, यापूर्वी श्रीगोंद्यात कार्यरत असतांना त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले असल्याचे तक्रारी निवेदन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ यांनी वरिष्ठ कार्यालयाला नुकतेच सादर केले आहे. Serious allegations against this officer! Demand for cancellation of appointment.
दिलेल्या निवेदनात ठवाळ यांनी नमूद केले आहे की, श्रीगोंदा तालुका ११५ महसूली गावांचा तालुका आहे. मोठ्या प्रमाणावर दैनंदिन खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. येथील दुय्यम निबंधक (सब रजिस्टर) यांची राहुरी येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी अहमदनगर कार्यालयातील श्री राशीनकर यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे.
यापूर्वीही श्री राशीनकर यांना श्रीगोंदा सब रजिस्टर कार्यालय प्रभारी अधिकारी नेमण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याविरूद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी झाल्या होत्या. म्हणून, त्यांची सध्याची प्रभारी नेमणूक त्वरित रद्द करावी व कार्यक्षम अधिकाऱ्याची कायमस्वरूपी नेमणूक करावी. असे निवेदन अनिल ठवाळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केले आहे.
स्रोत:(निवेदन)
