श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील १७ विद्यार्थ्यांची ” कॅम्पस इंटरव्ह्यू” द्वारे नोकरीसाठी निवड..

दिनांक २१ सप्टेंबर, श्रीगोंदा:

गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र टाळेबंदीची परिस्थिती होती. याचकाळात अनेक उद्योगधंदे, नोकरी सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. विद्यार्थ्यांचे सर्व काही ऑनलाईन सुरू आहे. डिग्री मिळत आहे पण रोजगार नाहीत.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असतानाच श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रदादा नागवडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट सेल कमिटी मार्फत श्री छत्रपती शिवाजी कॉलेज, श्रीगोंदा आणि अरबिंदो फार्मा लि., हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने, सोमवार दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी “कॅम्पस इंटरव्ह्यूचे” आयोजन केले होते.

श्रोगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक प्रशांतजी गोरे यांनी स्वागत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करतांना आपल्या भाषणात म्हटले की, “श्री छत्रपती शिवाजी कॉलेजमधील आणि आसपासच्या पंचक्रोशीतील बेरोजगार विद्यार्थ्यांना बापूंनी उभारलेल्या कॉलेजवर नोकरी मिळत आहे. खरं म्हणजे बापूंचे आणि आदरणीय राजेंद्र दादा नागवडे यांचे स्वप्न साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्यासोबत श्रीराम कृषी सेवा केंद्राचे सर्वेसर्वा नवनाथ रसाळसाहेब, तसेच, कला विद्याशाखा प्रमुख प्रा. महारनूर सर, वाणिज्य विद्याशाखा प्रमुख प्रा.साबळे सर उपस्थित होते.

या मेळाव्यात अनेक संधी तरुण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्या. यासाठी बी.एस.सी, विज्ञान आणि एम.एस्सी रसायनशास्र मधून विविध शाखेतून पदवीधर असणाऱ्या १८० तरुणांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी एकूण ३५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली.

याकरता, हैद्राबाद येथील औषधनिर्मिती क्षेत्रातील भारतातील पहिल्या १० मधील द्वितीय स्थानावर असलेली, तसेच भारतीय शेअर मार्केटच्या लिस्टमध्ये असलेली अरबिंदो फार्मा, लिमिटेड, हैद्राबाद येथील व्यवस्थापन समिती सदस्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील रसायनशास्र विषयाची पदवी घेतलेल्या एकूण १७ विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे नोकरीसाठी निवड केली आहे.

सात दिवसांच्या आत त्यांना कामावर हजर होण्यास सांगितले आहे. एम.एस्सी रसायनशास्र विषयाच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली आणि त्यांचे पुढील आठवड्यात टेलिफोनीक इंटरव्ह्यू होणार असल्याचे कंपनी व्यवस्थापन सदस्यांनी सांगितले. कंपनीमध्ये सध्या २३,००० पेक्षा जास्त कामगार काम करतात आणि वार्षिक उलाढाल २३,०००/ कोटी पेक्षा जास्त आहे. जगात १५ प्लांट असून भारताबाहेर अमेरिका, फ्रान्स आणि पोर्तुगाल मध्ये सुध्दा प्लांट आहेत.

राजेंद्रदादा नागवडे आणि प्राचार्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना कोव्हीड च्या काळात नोकरी मिळाली आहे. “कॉलेज हे फक्त डिग्री देणारे कारखाने नकोत, तर ते रोजगाराचे केंद्र व्हायला पाहिजे”, हा कै. बापूंचा विचार पुढे घेऊन महाविद्यालय वाटचाल करत आहे. अजून विद्यार्थ्यांच्या हातात निकाल आलेला नाही. तरी पण त्यांच्या हाताला काम मिळालेले आहे.

खरं तर कॉलेजने त्यांच्या भाकरीची सोय केली आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. या मेळाव्यात अहमदनगर दक्षिण भागातील कॉलेजमधील तरुण बेरोजगार मुलांना समाविष्ट केले होते. यामध्ये कटारिया कॉलेज, दौंड, महाराजा जिवाजीराव शिंदे कॉलेज, श्रीगोंदा, दादा पाटील कॉलेज, कर्जत आणि जामखेड कॉलेज, जामखेड तसेच शिरूर आणि बारामती मधील पण काही मुलांना सामाविष्ट केले होते. रसायनशास्त्र विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

महत्वाचे म्हणजे कंपनीसोबत सतत संपर्कात राहून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी त्यांच्याशी सतत पत्रव्यवहार, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संपर्क साधून या संधीविषयी माहिती देणे तसेच लेखी परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करून घेण्यासाठी आणि पुढील काळात अशा संधी उपलब्ध होण्यासाठी कंपनीसोबत सामंजस्य करार या सर्व गोष्टींकरता महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल कमिटी सदस्य प्रा.विकास इथापे, प्रा. विलास सुद्रिक आणि प्रा. प्रविण नागवडे यांनी विशेष मेहनत घेतली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अतुल लांबडे, आबा थोरात, अजित भिसे, नरेंद्र दिवेकर, हर्षल रोटे, निलेश इथापे, मोहन जाधव, अशोक जांभळे, प्रवीण कवडे, निखिल महारनूर, स्वप्नील मेहेत्रे, प्रितम मोढळे, अनिकेत मोहळकर, प्रविण रोटे, राजेंद्र सावंत, वैभव शिंदे आणि विवेक मचे यांचा समावेश आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, अनुराधाताई नागवडे सर्व विश्वस्थ, संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading