दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ श्रीगोंदा/नेवासा:
देशभर गाजलेल्या शनिशिंगणापूर बनावट ॲप घोटाळा प्रकरणात अहिल्यानगर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
ऑनलाइन दर्शन, पूजा-अभिषेक आणि तेल चढावा या नावाखाली भाविकांची ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, पोलिसांनी ३० जानेवारी रोजी नेवासा न्यायालयात २५०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले.

या प्रकरणात श्रीगोंदा (बनपिंपरी) येथील वरुण दत्तात्रय पाठक, माजी कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले, मृत उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे आणि इतर राज्यांतील ॲप मालकांसह एकूण ९ जणांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आले आहे.
देवस्थानचे कर्मचारी संजय पवार आणि सचिन शेटे यांना ४ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
‘पूजा परिसेवा घर मंदिर’, ‘हरिओम’, ‘ऑनलाइन प्रसाद’ यांसारख्या अनधिकृत ॲप्सनी देवस्थानची कोणतीही परवानगी न घेता भाविकांकडून पैसे उकळले.

पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. सायबर पोलिसांनी ७-८ महिने तांत्रिक तपास करून विविध बँक खात्यांची माहिती गोळा केली आहे.
“बनावट ॲप घोटाळा प्रकरणात सर्व तांत्रिक पुरावे गोळा करून ९ संशयित आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.”
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
