दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ श्रीगोंदा:
अहिल्यानगर जिल्हा पूर्णतः दारूमुक्त करावा आणि श्रीगोंदा तालुक्यातील अवैध धंदे तातडीने बंद करावेत, या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील लक्ष्मण ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली ९ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
तालुक्यातील अवैध धंदे पीआय (PI) किरण शिंदे यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आंदोलकांनी निवेदनात केला आहे.

दारूमुळे तरुण पिढी, विशेषतः ८ वी-९ वीतील मुले व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. निवडणुकीत होणारा दारूचा वारेमाप पुरवठा तरुणाईला बरबाद करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यापूर्वी २९ जानेवारीला होणारे आंदोलन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे स्थगित करण्यात आले होते. आता हे आंदोलन ९ फेब्रुवारीला पार पडणार आहे.

शासनाने केवळ महसुलाचा विचार न करता बहुजन समाजाचे हित जोपासावे, अन्यथा होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा निवेदकांकडून देण्यात आला आहे.
हे आंदोलन सुनील ओहोळ, विठ्ठल म्हस्के, त्रिंबक साळवे, नितीन जावळे, रोहित साळवे, कचरू लष्करे, राम ससाणे, भिमराव घोडके, अंबादास घोडके, काका साळवे, सतिश कुसाळकर व अन्य कार्यकर्ते पार पाडत आहेत.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
