दिनांक १८ मे २०२५, श्रीगोंदा, अहिल्यानगर:
तालुक्यातील बनपिप्रीं शिवारात एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले असून, आरोपीने एका महिलेला ठार मारून तिचा मृतदेह शेतात गाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फिर्यादीच्या माहितीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), २३८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी कल्याण राजेंद्र पठारे (रा. बनपिप्रीं, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) व त्याचे काही अज्ञात साथीदार यांनी फातिमा उर्फ आसमा शेख (वय अंदाजे २५-२६ वर्षे) हिला अज्ञात कारणास्तव ठार मारून स्कॉर्पिओ (क्र. MH १६ AT ६९७९) या वाहनाद्वारे मृतदेह हातवळण शिवारातील शेत गट क्र. १११ मध्ये नेऊन पुरला.

ही घटना दिनांक १७ मे २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास घडली असून, तपासादरम्यान मृतदेह गाडल्याचा प्रकार निष्पन्न झाला. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आ.मृ. नुसार चौकशी सुरू असताना शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने सदर गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणी आरोपी क्र. १ यास अटक करण्यात आली आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधीक्षक मा. राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मा. प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. विवेकानंद वाखारे, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरण शिंदे आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करत असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
— स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

