दिनांक ६ फेब्रुवारी श्रीगोंदा/सोलापूर:
दरोडा टाकून लूटमार करण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य दरोडेखोरांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिनांक २ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. त्यातील दोन जण श्रीगोंद्यातील धनगर वस्ती, लिंपणगाव (श्रीगोंदा कारखाना) येथील असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पोलिसांना धारदार शस्त्र व सोन्या-चांदीचा ऐवज आढळला आहे.

हे दरोडेखोर विजापूर रोडवरील एका सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. जयलिंग कैलास काळे (वय ३३), अमित महादेक ऊर्फ शंकर चव्हाण (वय ३६, दोघे रा. लिंपणगाव, धनगरवस्ती, ता.श्रीगोंदा, जि.नगर), सुनील विठ्ठल पिंगळे (वय ४८, रा. गुरुधनुरा, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर), रवींद्र धनसिंग पवार (वय ४५, रा. कुमार तळ, ता. जामखेड, जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, दोन दरोडेखोर पळून गेले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस रेकॉर्डवरील संशयित चोरटय़ांचा शोध घेत होते.
स्रोत:(वृत्तसंस्था)
