बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग १६)..

बनगरवाडी..

तोंडांना पाणी सुटले. ठासणीची बंदूक, गोफणी घेऊन त्यांची उमेदवार पोरे रानामाळांतून कांड्याकरकोच्यामागे धावू लागली. चुकूनमाकून चारदोन पाखरे पडू लागली. बऱ्याच दिवसांनी रामोशांच्या झोपड्यातून शिजल्या मासाचा वास घमघमू लागला. फुललेल्या करड्याच्या फुलांवरील मध गोळा करून अडचणीच्या जागी मधमाशांनी पोवळी केली. डहाळे पाडण्याच्या कुहाडी घेऊन धनगरा – रामोशांची पोरे रानांतून हिंडू लागली. नेपतीच्या झुडपांतून घातलेली पोवळी शोधून गोड मध खाऊ लागली. मग ज्वारीची पिके निघाली. करडा निघाला. हरबरा निघाला. खळ्यांची धमाल सुरू झाली. लोकांनी खळी शिपली. मोडणी झाली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

मोगलीचे घाव कणसांवर पडले. उपणणी झाली. वाऱ्याच्या झुळकीवर भुस्सा बाजूला गेला आणि मोत्यासारख्या ज्वारीची रास पडली. बारक्या बलुत्याची झिम्मड उडाली. राशी मोजल्या गेल्या. पाखरांनी, गुरांनी, चोरांनी नेऊन उरले ते धान्य शेतकऱ्यांच्या घरी आले. मोकळ्या झालेल्या शेंगांच्या, हरबऱ्याच्या, खपलीच्या रानांतून हिंडून गोरगरिबांनी सरवा वेचला. दाणादाणा वेचून घरी आणला. त्यांच्या नजरेतून सुटलेले दाणे पाखरांनी टिपले. मुंग्यांनी नेले. त्यातूनही राहिले ते जमिनातून पडून राहिले, पावसाची वाट बघू लागले. दहा महिन्यांनी हिरवी राने पुन्हा काळीकरडी दिसू लागली. सुगी संपली. पाखरे पांगली.

दाढेला तमाखू धरून लोक घटका घटका निवांत बसू लागले. कोल्हाटी येऊन उड्या मारू लागले. दरवेशी येऊन अस्वल खेळवू लागले, गारुडी हातचलाखी दाखवू लागले. हे खेळ बघून लोक मन रिझवू लागले, हसू लागले. खूष होऊन शेर – पायली धान्य गारुड्याला, कोल्हाट्याला, दरवेशाला देऊ लागले. धनगरांची कसबी पोरे गोळा होऊन गजी नाचू लागली. भिंगे लावलेल्या, पांढऱ्या दोऱ्यांनी मोर – बैलांची चित्रे काढलेल्या काळ्या छाटणी त्यांनी अंगात घातल्या. हातात रंगीबेरंगी रुमाल घेऊन फेर धरला, भलामोठा ढोल घेतलेला ढोल्या ‘इडिबांग – डीपांग’ करू लागला. झांजवाला झांज पिटू लागला.

हिरवे – तांबडे रुमाल उडवीत धनगर मागेपुढे पाय टाकू लागले. गजगतीने नाच सुरू झाला. हलके हलके गती वाढली. पाय भराभर पडू लागले. निळे – जांभळे रुमाल उडू लागले. ढोल घुमू लागला. बघता बघता ते पंचवीसतीस धनगर, तो ढोल्या हे सगळे एकत्र झाले. चपळ असा एकच कसबी माणूस धुंद होऊन नाचतो आहे असे वाटू लागले. घोंगडी खाली घेऊन बसलेले धनगर, दारात उभ्या राहून बघणाऱ्या बायका, पोरे देहभान विसरली. तो ताल त्यांच्याही अंगात भरला. ती गती त्यांनाही आली. सगळी बनगरवाडी नाचू लागली. ‘इडिबांग – डीपांग – डिचीबाडी – डीपांग – डीबाडी – डीपांग – डीपांग – डीपांग …. ‘एकाएकी बिथरलेला कारभारी बरेच दिवस माझ्याशी बोलला नाही. कधी शाळेत येऊन बसला नाही. कधी खोलीवर आला नाही. माझी वास्तपूस करण्याचे त्याने सोडून दिले. प्रथमप्रथम मला या गोष्टीची चुटपूट लागली, पण पुढे मीही ते विसरलो. थोडासा अहंकार माझ्यापाशीही आला. माझी काही चूक नसताना एकाएकी हा म्हातारा माझ्यावर बिघडतो, त्या बालट्याचा कानमंत्र घेऊन माझ्याशी भाषा करण्याचेही बंद करतो, हे नाही म्हटले तरी मलाही लागले. आपणहून म्हाताऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्याचे मी सोडून दिले. शाळेचा व्याप बरा वाढला होता. मुले बरी येत होती.

त्यांच्या परीक्षा, अभ्यास, उपस्थिती याकडे मला आता जास्त लक्ष द्यावे लागत होते. कारण वरचे अधिकारी येऊन जात होते. खेड्यापाड्यांतून शाळा काढल्या, आता त्यांचे यशापयश पाहिले पाहिजे, ही जाणीव शिक्षणखात्याला झाली होती. वरून निरनिराळ्या सूचना येत होत्या. हुकूम निघत होते. सुगीच्या सुटीत पांगलेली पोरे गोळा करून त्यांना पुन्हा नियमित शाळेला आणण्याचे कठीण काम आयबू करत होता, रामा बनगर करत होता, आनंदा रामोशी करत होता, आणि गावही आता मी बोलला शब्द मोडीत नव्हते.

शाळा आणि मास्तर यांविषयी आपलेपणा निमार्ण झाला होता. एका सोमवारी मी शाळेत गेलो आणि पोरांनी बातमी सांगितली की, तिसऱ्या इयत्तेत पहिला नंबर असलेल्या सताने एकट्याने लांडगा मारला. मला मोठे नवल वाटले. “कसा रे मारला? “बाभळ सवळायच्या कुन्हाडीनं तोडला, मास्तर. त्येचं कातडं वस्तीवर टांगलंय त्येच्या. “कुठाय सता? शाळेत नाही का आला ? ”आता त्यो शाळेला येणार न्हाई, मास्तर, त्येच्या बानं त्याला मेंढरांमागं लावलाय. “रात्री शाळेपुढे लोक जमले, तेव्हा सताने लांडगा मारल्याची हकीकत खरी का, ही गोष्ट मी

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading