दिनांक २३ जुलै २०२४,श्रीगोंदा:
सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा श्रीगोंदाचे इले. मिडीया प्रमुख अनिल तुपे यांनी एक महत्त्वाची राजकीय बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीवर काही व्यक्तींनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया देत अनिल तुपे यांचा अपमान केला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात येत आहे. पत्रकार संघाच्या अहवालानुसार, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ८८८८..८६०२, ९६६५..९६९६ आणि ९६६५..५४१२ या मोबाईल क्रमांकांवरून अनिल तुपे यांच्याविरोधात अपमानास्पद पोस्ट टाकण्यात आल्या.
याशिवाय, प्रसाद काटे या व्यक्तीने आपल्या मोबाईल क्रमांक ९४२२..८४१८ वरून जातीविरुद्ध द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्या आहेत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित मोबाईल नंबरधारक आणि ग्रुप ॲडमिन यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पोलिस निरीक्षक साहेब, श्रीगोंदा पोलिस स्टेशन यांच्याकडे करण्यात आली आहे.
पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जर या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्यात आली नाही, तर पत्रकार संघाच्या वतीने उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल. यामुळे प्रशासनाने त्वरित कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकारांच्या अपमानासारखे गंभीर प्रकरण वारंवार घडू नये, यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा पत्रकार संघाने व्यक्त केली आहे.
यावेळी संघटनेचे (तालुकाध्यक्ष) पत्रकार माधव बनसूडे, (सचिव) अमोल झेंडे, (संघटक) अमर घोडके, माऊली येऊले, अनिल तुपे, किशोर मचे सह ऑल इंडिया पँथर सेनेचे संजय रणशिंग आणि पवन रणदिवे उपस्थित होते. निवेदनाची प्रत पोलीस कर्मचारी आर. शिंदे यांना देण्यात आली आहे.
स्रोत:(निवेदन)






