जागा, निधी आणि स्लॅबचा ‘त्रिकोणी’ खेळ; श्रीगोंद्यातील पत्रकार भवनाचे स्वप्न धुळीला.!झाडाखाली बसून जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या लेखणीला हक्काचं छप्पर कधी.?

दिनांक ६ जानेवारी २०२६, श्रीगोंदा:

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज श्रीगोंदा येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकारांच्या हक्काच्या ‘पत्रकार भवनाचा’ प्रश्न ऐरणीवर आला असून, नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पत्रकार वर्गात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. “पुढारी येतात, बोलतात आणि निघून जातात,” अशीच काहीशी भावना आता स्थानिक पत्रकारांमध्ये निर्माण झाली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांना स्वतःचे हक्काचे व्यासपीठ असावे, यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. या मागणीचा फायदा घेत अनेक बड्या नेत्यांनी आजवर केवळ आश्वासनांची गाजरे दाखवली आहेत.

माजी आमदारांनी पूर्वी आमदार निधीतून तरतूद करण्याचे जाहीर केले होते. आज पुन्हा त्यांनी नगरपालिकेत शुभेच्छा देताना जागा निश्चित करण्याची ग्वाही दिली.

राजेंद्र नागवडे यांनी दोन गुंठे जागा देण्याचे आश्वासन दिले होते, जे अद्याप कागदावरच आहे.

राहुल जगताप माजी आमदारांनी त्या जागेवर स्लॅब टाकून देण्याचे घोषित केले होते. दुर्दैवाने, जागा कुणी द्यायची, निधी कोणी आणायचा आणि बांधकाम कोणी करायचे, या त्रिकोणी संघर्षात पत्रकार भवनाचे स्वप्न मात्र धुळीला मिळाले आहे.

श्रीगोंदा शहर आणि तालुक्यातील पत्रकारांना आजही हक्काची बैठक व्यवस्था नाही. सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पत्रकारांना कधी झाडाखाली, कधी हॉटेल्समध्ये तर कधी रस्त्यावर उभे राहून काम करावे लागते.

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या या घटकाला स्वतःच्या हक्काच्या छतासाठी दशकांपासून संघर्ष करावा लागत आहे, ही तालुक्यासाठी खेदाची बाब आहे.

https://www.amazon.in/dp/B0F4R3GFMQ/ref=cm_sw_r_as_gl_apa_gl_i_GR9FKCRJNHWAWGBW4270?linkCode=ml1&tag=nirbhidkalam-21&linkId=b29fc31b2c8b3ccb5f5254e630dbe6b3

राजकारण्यांच्या ‘तारीख पे तारीख’ देण्याच्या या भूमिकेला आता पत्रकार कंटाळले आहेत. तहसील परिसरातील मोकळ्या जागेत भाड्याने भागीदारी करून एखादी टपरी टाकावी किंवा थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा, अशी संतप्त चर्चा आता पत्रकार वर्तुळात सुरू झाली आहे.

“आजचा दिवस निभावून नेण्याची कला नेत्यांनी अवगत केली असली, तरी पत्रकारांचा संयम आता सुटत चालला आहे,” असे मत काही पत्रकारांनी व्यक्त केले.

नेत्यांचे राजकीय हित साधण्यासाठी पत्रकारांचा वापर होतो, मात्र त्यांच्या मूलभूत गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असेच आजच्या चित्रावरून स्पष्ट झाले आहे. २०२६ उजाडले तरी ‘पत्रकार भवन’ प्रत्यक्षात येणार की पुन्हा पुढच्या वर्षी नवीन आश्वासनाची वाट पाहावी लागणार, हाच प्रश्न कायम आहे.

स्रोत: अधिकृत माहिती

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading