दिनांक ७ जानेवारी २०२६,श्रीगोंदा:
तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, एका २५ वर्षीय तरुणावर भरदिवसा पालघनने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
काष्टी येथील ओंकार विठ्ठल हरीहर या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार हरीहर हे ‘आप्पा जाधव’ यांच्यासोबत का राहतात, या कारणावरून आरोपी साई संजय मदने याने ५ जानेवारी रोजी वारंवार फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व “घरात घुसून कापून टाकीन किंवा गोळ्या घालीन” अशी धमकी दिली होती.

त्यानंतर सायंकाळी ५ ते ५:३० च्या सुमारास ओंकार हे श्रीगोंदा-काष्टी रोडने आपल्या ॲक्टिव्हावरून जात असताना, अनन्या हॉटेलजवळील विटभट्टीजवळ आरोपींनी त्यांचा पाठलाग केला.
बुलेट आणि अन्य एका दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी ओंकार यांच्या गाडीला लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर त्यांना विटभट्टीच्या आडोशाला नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
मुख्य आरोपी साई मदने याने ओंकार यांच्यावर पालघनसारख्या धारदार हत्याराने जीवघेणा वार केला, मात्र ओंकार यांनी तो वार हुकवल्याने त्यांचा जीव वाचला.

श्रीगोंदा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय हत्यार कायदा (Arms Act) अन्वये गंभीर गुन्हे दाखल केले आहेत..
तर यातील आरोपी साई संजय मदने, पियुष बाळासाहेब घोडके आणि सौरभ राहुल घोडके यांना अटक करण्यात आली असून, विशाल गव्हाणे, मयुर गव्हाणे आणि एक अनोळखी इसम यांचा पोलीस शोध घेत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहिती)
