दिनांक ८ जानेवारी २०२६,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू येथे एका मोठ्या कंपनीच्या प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन सर्वेक्षणादरम्यान मारहाणीची घटना घडली आहे.
स्थानिक नागरिकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना अडवून बेदम मारहाण केली असून, या हल्ल्यात कंपनीचे मॅनेजर गंभीर जखमी झाले आहेत. टणक वस्तूने केलेल्या प्रहारा मुळे मॅनेजरच्या कानाचा पडदा फाटून त्यांना कायमचे बहिरेपण आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निमगाव खलू परिसरात एका मोठ्या कंपनीचा प्रकल्प नियोजित आहे. यासाठी जमिनीची पाहणी, मोजणी आणि अधिग्रहण प्रक्रियेच्या नोंदी करण्यासाठी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी नियमितपणे या ठिकाणी येत असतात.
काल (७ जानेवारी) नेहमीप्रमाणे कंपनीचे पथक कामासाठी गेले असता, काही स्थानिकांनी त्यांना मज्जाव केला. “या जमिनी आमच्या आहेत, तुम्ही येथे काय करताय?” असे म्हणत जमावाने वादाला सुरुवात केली.
पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या स्थानिकांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत दमदाटी सुरू केली.

यावेळी झालेल्या झटापटीत एका इसमाने कंपनीच्या मॅनेजरच्या कानावर टणक वस्तूने जोरदार प्रहार केला. हा वार इतका भीषण होता की, मॅनेजरच्या कानातून जागीच रक्तस्त्राव सुरू झाला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अवस्थेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठले.
पोलिसांनी जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी धक्कादायक माहिती दिली. हल्ल्यामुळे मॅनेजरच्या कानाचा पडदा फाटला असून, त्या कानाने ऐकू येण्याची क्षमता पूर्णपणे संपली आहे (बधिरत्व आले आहे). त्यांच्यावर सध्या अधिक उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन ओळखीच्या आणि तीन अनोळखी अशा एकूण पाच इसमांच्या विरोधात मारहाण, दमदाटी आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवले आहेत.
स्रोत:(अधिकृत माहिती)
