श्रीगोंदा पोलिसांनी १२ तासांत उघड केला रॉबरीचा गुन्हा; ४ आरोपींना बेड्या, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त..

दिनांक ८ जानेवारी २०२६ श्रीगोंदा:

फोटोग्राफीच्या शूटसाठी गेलेल्या तरुणांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि चोरीला गेलेला कॅमेरा असा एकूण ११,५०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बोरुडगल्ली (श्रीगोंदा) येथील व्यावसायिक फोटोग्राफर ओम संतोष शिंदे (वय २३) हे ३ जानेवारी २०२६ रोजी आपल्या दोन मित्रांसह वडाळी रोडवरील जंगलात फोटोशुटच्या ऑर्डरसाठी गेले होते.

यावेळी विनानंबरची बुलेट आणि कारमधून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांना गाठले. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी, प्लास्टिक पाईपने आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत शिंदे यांच्याकडील ३ लाख रुपये किमतीचा कॅमेरा आणि ३८ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून नेली होती.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तपासासाठी दोन पथके तयार केली. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे, मांडवगण फाट्याजवळ संशयास्पद रितीने फिरणारी काळी स्विफ्ट कार (MH 16 DS 2697) पोलिसांनी अडवली.

प्रसाद तात्याराम झराड (वय २५, रा. बेलवंडी कोठार, श्रीगोंदा), प्रतिक बिभीषण कराळे (वय २१, रा. बोरुडी, ता. आष्टी), विनायक गौतम दांगडे (वय २२, रा. देऊळगांव गलांडे, श्रीगोंदा), युवराज सुनिल पठारे (वय २१, रा. बाळेवाडी, ता. आष्टी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तर एक काळ्या रंगाची स्विफ्ट कार (MH 16 DS 2697), एक विनानंबरची काळी बुलेट, गुन्ह्यात चोरलेला ३ लाख रुपये किमतीचा कॅमेरा, लोखंडी रॉड आणि गुन्ह्यावेळी वापरलेले मास्क असा एकूण किंमत: ११,५०,२००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

https://amzn.to/49f81uQ

आरोपींनी ओळख पटू नये म्हणून मास्कचा वापर केला होता, मात्र पोलिसांनी कौशल्याने त्यांचा शोध लावला. न्यायालयाने आरोपींना ९ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. किरण शिंदे, गहिनीनाथ यादव, महादेव कोहक, अरुण पवार, सचिन वारे आणि निखील मसराम यांच्या पथकाने केली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading