श्रीगोंदा: दोन सराईत गुन्हेगार सहा महिन्यांसाठी हद्दपार..

दिनांक २९ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार श्रीगोंदा पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी दोन सराईत गुन्हेगारांचा हद्दपारी प्रस्ताव दिला होता. उपविभागीय दंडाधिकारी यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत श्रीगोंदा तालुक्यातील उमेश शिवाजी वेताळ (रा. लिंपणगाव) आणि मुक्तार मेहमूद काझी (रा. पेडगाव) या दोघांना सहा महिन्यासाठी जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार केले आहे.

वाळूचोरी आणि मारहाणीचे गंभीर गुन्हे;
श्रीगोंदा पोलिस ठाण्यात वाळूचोरी आणि मारहाणीचे विविध गुन्हे या दोघांविरोधात दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश शिवाजी वेताळ यांच्यावर भांडणाचे सहा आणि आर्मी ऍक्ट अंतर्गत एक गुन्हा दाखल आहे. तसेच मुक्तार महमूद काझी यांच्यावर चोरीचे तीन गुन्हे नोंदवले आहेत.

मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ५६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी श्रीगोंदा-पारनेर यांनी दिलेल्या आदेशानुसार या दोन्ही आरोपींना सहा महिन्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे श्रीगोंदा परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे. पोलिस प्रशासनाने अशा गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading