दिनांक २९ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:
तालुक्यातील एका गावात आणि बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत आज दुपारी जातीय रोषामुळे भीषण घटना घडली. १९ वर्षीय तरुणाला जवळपास वीस ते पंचवीस लोकांनी जबर मारहाण केली. गळा दाबून त्याला जीवंत मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. “(आमच्या) उच्चवर्णीयांच्या नादी लागलात..! तर तुमच्या वस्त्या जाळू, घरात घुसून मारू” अशा धमक्या देत लोकांच्या टोळक्याने तरुणाला त्याच्या कुटुंबीयांसमोर मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

ही घटना मागासवर्गीय मातंग समाजाच्या तरुणाने उच्चवर्णीय समाजातील मुलीसोबत कुटुंबाच्या परवानगीशिवाय पळून जाऊन विवाह केल्यामुळे घडली असल्याचे समजते. काही दिवसांपासुन या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण होते. मागे नमूद मुलीला गाडीवर लिफ्ट दिल्याच्या संशयावरून मुलीच्या कुटुंबातील लोकांनी व संबंधितांनी त्या युवकाला जबर मारहाण केली. मारहाणीत त्याच्या गुडघ्यांना गंभीर दुखापत झाली असून, तो चालू शकत नाही.

घटनेनंतर गावातील पीडित कुटुंबियांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यांना पोलीस स्टेशनला जाण्यास मज्जाव करण्यात येत असून समाजावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली जात आहे. दहशतीच्या या वातावरणामुळे गावात भीतीचे सावट आहे.

पीडित कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. जातीय तणाव निर्माण करून कायदा हातात घेणाऱ्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.
स्रोत:(मिळालेल्या अधिकृत माहितीनूसार)

जाहीरात..
