अहिल्यानगर, दि. २९ जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, साठा व तस्करीवर कठोर भूमिका घेऊन कारवाई करावी, तसेच अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते बोलत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते म्हणाले, “शाळा व महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यावर भर देण्यात यावा. ड्रग्स डिटेक्शन किट्स व टेस्टिंग केमिकल्सची उपलब्धता सुनिश्चित करून तपास यंत्रणेला अधिक बळकटी देण्यात यावी. पोलीस विभाग, एनसीबी व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या कारवाईची माहिती एकत्रित करून अद्ययावत डेटाबेस तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.”
जिल्ह्यात १ जानेवारी ते २८ एप्रिल २०२६ दरम्यान अमली पदार्थ बाळगणाऱ्या ९ प्रकरणांमध्ये १२ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लागवडीच्या प्रकरणातील २ गुन्ह्यांमध्ये ३ व्यक्तींवर, वाहतुकीसंदर्भातील ३ प्रकरणांमध्ये ८ व्यक्तींवर आणि अमली पदार्थ सेवनाच्या २६ प्रकरणांमध्ये ३२ व्यक्तींवर, अशा प्रकारे अमली पदार्थांच्या एकूण ४० प्रकरणांमध्ये ५५ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती श्री. भोये यांनी यावेळी दिली.
अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते















Leave a Reply