प्रेमकथा..
ते क्षण पावसाचे .. ! संध्याकाळची वेळ आणि पावसाची पहिली सर येऊन गेली… आणि तिची आठवण ही येऊन गेली . कॉलेज सुटलं होत … ! तेव्हा संध्याकाळ झाली होती … आम्ही मित्र मिळून घरी जात होतो . ती आमच्या पुढे चालत होती… ती तिच्या विचारात जात होती … आम्ही गप्पा मारत जात होतो. अचानक गार वारा सुटला … झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येत होती … ढगांचा गडगडाट झाला … कुठेतरी वीज चमकली … सर्वदूर अंधारून आलं होत … पक्षी घराकडे परतत होते. प्रत्येकाला घरी पोहोचण्याची घाई होती . तशी मित्रांनी ही धूम ठोकली . मी एकटाच राहिलो होतो . थोडी पावसाची रिमझिम सुरू झाली … मी एका झाडाखाली थांबून गेलो होतो . तशी माझ्याकडे छत्री होती.पण वारा जोराने असल्याने ती छत्री उघडण शक्य नव्हतं . असाच थोडा वेळ गेला … वाऱ्याने विश्रांती घेतली होती … आणि पावसाने एन्ट्री केली होती.थोडा पाऊस पडला आणि मग त्याचा जोर कमी झाला … तशी मी छत्री उघडली आणि निघालो .
समोरच्या झाडाखाली ती उभी होती … ती माझ्याकडे पाहत होती … तसा मी तिचा क्लास मेट होतो … ! काही तरी अपेक्षेने पाहत होती … असं मला वाटलं . माझ्या लक्षात आलं आणि मी पुढे जाऊन तिच्या समोर छत्री धरली … तशी ती हसली … अरे तू तर भिजतो आहेस … ! तिच्या डोक्यावर छत्री धरल्यामुळे मी भिजत होतो.मग तिच्यासोबत मीही छत्राखाली आलो . रस्त्याने जातांना ती बोलत होती … मी ऐकत होतो . तिला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने मी तिच्यासोबत जात होतो . एका बाजूने मी भिजत होतो … दुसऱ्या बाजूने थोडी ती भिजत होती . इतक्या जवळ कधी मी कोणत्या मुली जवळ गेलो नव्हतो. पण या पहिल्या पावसात ती भेटली आणि आम्ही जवळ आलो होतो . त्यानंतर आमच्यात मैत्री झाली … आणि विचार जुळू लागले … मन ही जुळू लागले होते . मला वाटायला लागलं , की त्या पहिल्या पावसात आमची शरीर पावसाने चिंब ओले झाले होते आणि मन प्रेमाने चिंब झाले होते . पहिला पाऊस हाच आमच्या प्रेमाची ओळख होता . पावसात कुठलं ही बीज अंकुरत आणि त्याचा विशाल वृक्ष ही होतो … मग आमचं प्रेम पावसात अंकुरल नसतं तरच नवल होते . बऱ्याच वेळा भेटी गाठी होत राहिल्या … अशी कॉलेजची तीन वर्ष गेली … मी आता नोकरी शोधून तिच्या प्रेमाची … सुखी संसाराची स्वप्न पाहत होतो . तीही त्याच स्वप्नात रंगली होती … !
मी नोकरीनिमित्त मुंबईला आलो होतो … नवी नोकरी असल्याने घरी जाणे शक्य होत नव्हते … तिच्या आणि माझ्या घरच्यांना आमच्या प्रेम प्रकरणाची माहिती होती … तेही आमचं लग्न लावून द्यायला तयार होते … ! कधी मधी तिची पत्र यायची … त्यात ती संसाराची चित्र लिहून पाठवत होती … मी ही तिला पत्र लिहायचो … … तिच्या येणाऱ्या आठवणीबद्दल लिहायचो . ते वाचून ती रडायची. ते पत्र मी भेतल्यागत छातीशी लावून लिहायचो … ती आपलं थोडक्यात मांडायची . असच एक वर्ष गेलं … आता मी घरी जाणार होतो … ! तस तिला पत्र लिहिलं नव्हतं … तिला सरप्राइज देऊ असं ठरवलं होत . मी घरी आलो नाही … तिला भेटलो नाही … म्हणून ती नाराज होती . तस काही दिवसापासून तिचंही पत्र नव्हतं . मी लिहायचो पण तिचं पत्र नव्हतं . काहीतरी कामात असेल म्हणून, ती पत्र लिहू शकली नसेल.असा विचार करून मी घरी निघालो . बसमधून उतरल्यावर तिच्या घराकडे निघालो . मध्ये काही जण दिसले … त्यांना मी हात केला पण ते पटकन निघून गेले. मला वाटलं त्यांचं लक्ष नसावं . समोर माझ्या मित्राचं दुकान होत … मी त्याला हाक मारली.तर,तोही काम आहे म्हणून निघून गेला … ! काय झालं यांना … का असं वागत आहेत . घरी जाईपर्यंत संध्याकाळ झाली होती … जूनची सुरुवात होती … थंड वारे वाहत होते … ढगांचा गडगडाट ऐकू येत होता … कुठेतरी वीज चमकत होती … आणि पावसाचे थेंब पडू लागले … खूप बरं वाटलं … ! आमच्या प्रेमाची सुरूवात याच वेळी झाली होती … पहिल्या पावसात … याची मला आठवण झाली . आजही तेच वातावरण आणि आमची भेट … काय सुंदर योगायोग होता . मी आनंदाने तिच्या घरी पोहोचलो … आणि तिला आवाज दिला …. ‘
प्रिया … प्रिया …. बाहेर ये … ! बघ मी आलो … आणि बघ पहिल्या पावसाला ही सुरुवात झाली आहे … ! ” तिची भेट होईल या विचाराने माझे मन मोहरुन आले होते … अंगावर रोमांच उभे राहिले . तिच्या दर्शनासाठी … तिच्या भेटीसाठी मन अधीर झाले होते . बस दरवाजा उघड आणि बाहेर ये … हा पाऊस … हे सुंदर दृश्य … ही झाडे …. हे पक्षी … पावसाची रिमझिम आहे …. मी आहे … फक्त तुझीच कमतरता जाणवत आहे … बघ तुझ्यासाठी तुझ्या आवडत्या गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणला आहे … ! ती आली नाही … मी तिच्या भेटीसाठी अधीर झालो होतो … म्हणून मी दरवाजा ठोकला … तसा दरवाजा उघडला . समोर तिचे वडील होते … त्यांचा चेहरा उतरलेला होता … डोळे लाल झाले होते . प्रिया आपल्याला सोडून गेली … राजा .. ! सोडून गेली … ! तिने तुला कळवायला नाही सांगितलं … त्याला खूप त्रास होईल म्हटली … ! छोट्याशा आजारातच …. ” आणि ते रडू लागले . माझ्या डोळ्यातील अश्रू पावसाच्या पाण्यात वाहून जात होते . बराच वेळ मी पावसात भिजत राहिलो … तिच्या आठवणी त हरवत राहिलो . पहिल्या पावसात अंकुरलेल रोप लवकरच कोमेजून गेलं होत . तिच्यासाठी आणलेला गुलाबाच्या फुलांचा गुच्छ तसाच पावसात भिजत होता …. तीच आहे असं समजून तो गुच्छ मी छातीशी कवटाळत राहिलो आणि तसाच पावसात उभा राहून भिजत राहिलो .
इतक्या वर्षानंतर ही … पहिला पाऊस पडला की … तिची आठवण येते … मन अस्वस्थ होत आणि मी चपला घालून बाहेर पावसात जातो… त्या रिमझिम पावसात … तिच्या आठवणीत भिजत राहतो … बराच वेळ … !
(लेखक:संजय प्रभाकर पाटील)…
