अपूर्ण प्रेम पत्र..

प्रेमकथा…

(लेखक:विनित धनावडे..)

तुझ्या त्या चेहऱ्यावरचं हसू तसंच रहावं , सदा …. असंच मला वाटते नेहमी . म्हणून मनातलं कधी ओठांवर आणलं नाही . कदाचित ते ऐकून तुझ्या चेहऱ्यावरचं smile नाहीसं झालं असतं किंवा अजूनच खुललं असतं …. आणि ते नाहीसं होणे , हे स्वयम परमेश्वरालाही रुचलं नसतं …. हा , अजून खुललं असतं तर ते किती छान त्या उजव्या गालावर … नाही … नाही , डाव्या गालावर पडणारी खळी तर काही औरच …. त्यातून स्तुती केली तर काय खुलते खळी ती , … क्या बात !!!! स्वर्गीय क्षण अगदी … मुळात ती खळी नाहीच , डोह आहे तो … मोहाचा डोह … कायम त्या डोहात बुडून जावे असा . … …गालावरची खळी तर फक्त निमित्त मात्र , तुझ्या चेहराच किती बोलका आणि सुंदर …. इतका सुंदर चेहरा बनवणं त्या देवाला पुन्हा काही जमलं नसावं बहुतेक … चंद्र , चांदण्याची उपमा मला देयाची नाही त्या चेहऱ्याला …. उगाचच कशाला ना . त्या चेहऱ्याची किंमत मला कमी करायची नाही . त्याला दुसरं कोणतचं नावं शोभलं नसतं . म्हणून मी ” सुंदर ” च नावं ठेवलं तुझं …. ” सुंदर ” फक्त बोललं तरी किती छान वाटते मनाला , ” सुंदर … सुंदर … सुंदर ” …… किती वेळा नाव घेतलं तरी मन भरत नाही … पाणीदार डोळे , केसही काळेभोर … मागे बांधलेल्या केसांपेक्षा … मोकळे केस , छानच वाटतात तुला . येत – जाणाऱ्या वाऱ्यासोबत ते डोलत असतात . कधी तुझ्या चेहऱ्यावर मुद्दाम येतात . मग हळूच तू ते केस मानेवर एका बाजूला करतेस … तो सोहळा तर देखणा अगदी … त्या क्षणाला मनात खूप काही होते … अर्थात चांगलचं … तुझ्याविषयी वाईट असं येत नाही मनात .हा , फक्त एकदाचं आलं होतं … वाईट म्हणू शकत नाही . पण आलेलं … तू जेव्हा जीभ काढून वेडावून दाखवलंसं ना तेव्हा … हो तेव्हाच … वाटलं ,

असंच तुला कूठेतरी पळवून घेऊन जाऊ . या जगापासून लांब … खूप लांब , अश्या ठिकाणी , जिथे कोणत्याच भावना नसाव्यात …. सुख – दुःख , ते तर खूप लांब असावं . फक्त तिथे असाव्यात आपल्या आठवणी … धुरकट असल्या तरीही चालतील , मग तिथेच एखादं छान असं टुमदार घर बांधावं … एखादी तुटकी – मुटकी झोपडीही चालेल . तुला आनंदात ठेवलं पाहिजे , बस्स … एवढंच मनात . दुःखाची सावली सुद्धा नसावी त्या संसारावर … आनंदाचं झाड असावं , आनंदाचे ढग , आनंदाची जमीन … सगळीकडेच आनंद … आभासी जग सगळं … तरीही तुझ्यासाठी निर्माण करीन मी . एकदा पावसात भिजून आली होतीस … तेव्हा तर कळलं होतं , प्रेम काय असते ते , तेव्हापासून पाऊस मुद्धाम आवडायला लागला … तुझ्यामुळे पाऊस आवडायला लागला . प्रत्येक पावसात तुलाच बघतो …. अजूनही आणि पुढेही तसाच बघत राहीन … तुला रोज बघायची सवय तुच लावली आहेस ना . रोज एकतरी फोटो पाठवतेस मला … प्रत्येक फोटोत निराळीच वाटतेस …. वाटते , सगळ्या फोटोजचे फ्रेम करून घरात लावून टाकू , घराची शोभा वाढेल … पण लोकांच्या नजरा कश्या टाळायच्या ना … उगाचच नजर लागली असती तुला … म्हणून मनातचं सगळे फोटो फ्रेम करून लावून दिले … अगदी खिळे ठोकून .तसा मी एकटाच …. status : Single म्हणजे … रोज घरी येता – जाता एखाद – दुसरं ” couple ” तरी दिसतेच . कधी बाहेर फिरायला गेलो तरी तिथेही प्रेमी युगुल ” असतात . मॉलमध्ये गेलो तरी तिथे एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना पाहतो . तेव्हा मनात वाटून जाते , आपली सुद्धा अशी कोणी ” G.F. ” असावी . G.F. चा full – form सांगायची गरज नाही ना … तसंच वाटते नेहमी , आपल्या सोबत कोणीतरी अशीच असावी , बाईकच्या मागच्या सीटवर बसून मला घट्ट धरणारी , ट्रेनमध्ये विंडो सीटजवळ बसून हळूच , नकळत माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी जाणारी , समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय मोकळे सोडून बसणारी आणि माझ्या call ची वाट बघणारी .हे बघ , … असं होतं नेहमी , तुझ्याबद्दल बोलताना … काहीच लक्षात राहत नाही … असो , आता विषय सुरु केला आहे तर सांगूनच टाकतो मनातलं … तू खूप आवडतेस मला आणि मी तुला मनापासून आवडलो पाहिजे म्हणून सतत प्रयन्त करत राहीन … मला तुझं वेडं लागलं आहे , तरी माझा श्वास तुझी गरज बनावं असं वाटते मला …. तू समोर नसताना एक अस्तित्वहीन जग निर्माण होते … तरी माझा वावर तुझं जग निर्माण करणारा असावा , असं वाटते मला …. तू भेटायला येताना नेहमी उशिरा येतेस , तशी तुझी तासनतास वाट बघायची आहे मला … आणि मी उशिरा आलो तरी तुझ्या रागावलेल्या प्रत्येक भावनांना एक छान गोड हास्य देऊन पळवायचे आहे मला ….. तू तर रोज स्वप्नात येतेस माझ्या , तरी तुझ्याकडून स्वप्नात येतं जाऊ नकोस रे माझ्या , नीट झोप लागत नाही ” असं ऐकायचं आहे मला …. रोजच्या गर्दीत , रोजचं शोधत असतो तुला … चुकून भेट झाली तर …. पण माझ्यासाठीही तू त्या गर्दीत , टाचा उंच उंच करून शोधावं असं वाटते मला …. तुझ्यावर कविता करून करून वहीची किती पानं भरून गेली , तरी तुझ्याकडून एखादी छानशी ” चारोळी ” ऐकायची आहे मला .

खरंच … तुझ्यासाठी मी जन्मभर वाट बघत राहीन , अगदी शेवटपर्यंत … तू कधी ना कधी येशीलच … ज्या क्षणाला तू माझ्याजवळ येशील , त्या क्षणालाच माझ्या हृदयाच्या तुरुंगात तुला डांबून ठेवीन , ते माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत …. तू कितीही विनवण्या केल्यास तरी , कोणताही वकील … साक्षात परमेश्वर वकील बनून आला तरी … त्यातून तुला मुक्तता नाही मुळीच … मी कूठेही गेलो तरी तुला सोबतच घेऊन जाईन … आणि तुझ्यासोबत कूठेही येईन , अगदी जगाच्या अंतापर्यंत … मनापासून येईन तिथे … मनात कोणतेही भाव नसताना … फक्त तुझी साथ असणंचं खूप आहे …. कधी रागावलीसं कि जरा मुद्दाम घाबरेनं किंवा त्या फुगलेल्या गालांना बघून हसेन … उलट उत्तर नसेल कधीही माझ्याकडून …. तुझे फोटो हे मी असे मनात फ्रेम करून ठेवले आहेत , त्यांना तसंच ठेवीन जन्मभर … तुला आवडलं तर … नाही आवडलं तर ते काढून टाकीन , खिळ्यासहित … खिळे काढताना जखमा होतील मनात , तोंडातून साधा आवाज काढणार नाही … रक्त आलं तरी … पावसाच्या प्रत्येक थेंबात तुलाच शोधत राहीन … आणि तू म्हणालीस तर तुझ्यासाठी त्या पावसालाही विसरून जाईन मी , कायमचा …. विसरून जाईन ते , कसं असतं वेडयासारखं भिजणं पावसात …. सरीवर सारी कोसळताना गरम चहाचा घोट काय भावना देतो तेही विसरून जाईन मग … सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यात हात पसरून उभं राहणं काय असते ते विसरून जाईन कायमचा …हे Love letter … असचं अपूर्ण राहिलं … तू त्याचा स्विकार केलास तर ते पूर्णत्वास जाईल … फक्त तू ठरवलंसं तर …. त्या गालावर पडणाऱ्या खळीच्या डोहात मला कायमचं बुडून नष्ट , नामशेष होयाचे आहे … तुझं उत्तर काहीही असो , …. माझं निस्सीम , निर्मळ प्रेम तुझ्यावर तसंच राहिलं … आणि मी शेवटपर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन …. जळून जाईन त्या प्रेमाच्या अग्नीत … तरी प्रेम तसंच तेवत ठेवीन मनात …… कायमचं . तुझाच , ” निस्सीम भक्त … “

(संकलित)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading