बलुत..
पुढं आयुष्यभर ही घटना दादा विसरले नाहीत . दोघे भाऊ मुऱ्हाच्या शोधाकरिता रानोमाळ भटकतात . तात्यांच्या मनातही हा अपमान खदखदत होता . त्याचवेळी उमाआज्या आपल्या मुलीला भेटायला मुंबईला आला . त्याची मुलगी कावाखान्यातच दिली होती . त्या रात्री तात्यांनी उमाआज्याला हिरवा – निळा होईपर्यंत वतानं झोडपून काढलं . उमाआज्या जोरात किंचाळत होता . कुणीही सोडवायला गेले नाही . झालेल्या प्रकारामुळं असेल , दादांनी आम्हा मायलेकरांना कायमचं मुंबईला आणलं . दादा रिटायर होईपर्यंत आम्ही कावाखान्यातच होतो . १९४४ साल आठवतं , ते केवळ गोदीत बॉब स्फोट झाला म्हणून . वांद्रा इथं आजीची ताईबाई नावाची बहीण होती . आजीची ही दूधबहीण . आई एक आणि बाप दोन . तिला लहानपणापासून खंडोबाला मुरळी सोडलेली होती . पण कळू लागल्यापासून तिनं तो पेशा सोडला होता . एखाद्या गड्यासारखी कष्ट उपसायची . स्वभावानं खूपच प्रेमळ . तिनं एकदा हातात घातलेल्या राजापुरी बांगड्या मरेपर्यंत फुटल्या नाहीत , म्हणून तिचं आजही कौतुक होतंय . ती भावाच्या संसाराला हातभार लावायची . भाऊ उमेदीतच मेल्यानंतर त्याच्या तरण्या बायकोला लेकरासारखं सांभाळलं . तिच्या एकुलत्या एका मुलाला नावारूपाला आणलं . वांद्रयाला मुसलमान – ख्रिस्ती वस्तीत राहूनही यांच्या वाटेला जाण्याचं कुणात धाडस नसायचं . नणंदेला छेडणाऱ्या एका मुसलमानाला यांनी दगडावर आपटलं , असा यांचा बोलबाला .
माउंट मेरीजवळ खिश्चन मुला – मुलींचं एक वसतिगृह होतं . तिथं बाजारहाट पोहेचव , मटणाच्या पाट्या घेऊन जा , हा ह्या आजीचा धंदा . माउंट मेरीची यात्रा असली , म्हणजे आम्ही सारे कुटुंबीय आधीच सात दिवस जाऊन तिच्याकडे मुक्काम ठोकीत असू . एकतर तिच्याकडे खाण्याची खूपच चंगळ व्हायची . मोढ्याचं मटण , मासे मुबलक मिळायचे . माउंट मेरीच्या जत्रेत हुंदडायला मिळायचं . तिचं घर खाडीला लागूनच होतं . तिथं कडेलाच डुंबायला मिळायचं . घरापासून दूरवर समुद्राचा भव्य पसारा नजरेच्या टप्प्यात यायचा . सर्व वातावरणात माशाचा वास . समुद्राच्या काठी रेतीत शंखशिंपल्यांचं घर बनविण्याचा खेळ . असाच एका संध्याकाळी समुद्रात कडेलाच डुंबत होतो . सूर्य घरंगळायला विशेष अवकाश नव्हता . एकाएकी कुलाब्याच्या दिशेनं समुद्रातून प्रचंड ज्वाला दिसू लागल्या . रॉकेलच्या समुद्रानं पेट घेतलाय , असं दृश्य , कानठळ्या बसविणारा स्फोटही झाला . धावतपळत घरी आलो . सोबत आजी . आगगाडीत एकच चर्चा , बाँबे सेंट्रलला उतरलो . बाहेर येऊन पाहू लागलो , जो तो मिळेल त्या वाहनानं मुंबई सोडतो आहे . साऱ्या शहरात एकच हाहाकार . काय झालं ते नेमकं समजेना . कावाखान्यात येताच समजलं ,की गोदीत बाँबस्फोट झाला म्हणून . आम्ही घरातील सारेच चिंतेत . दादा आणि तात्या गोदीतच कामाला . दादा आणि तात्या घरी आले , ते मुळातच खुशखबर घेऊन . आता गोदीत जळीत झालय . आपल्याला मोठं डबोल मिळेल ‘ ह्या खुशीत सारे . कावाखान्यात एकच चर्चा . कुणाचं छप्पर फाडून घरात सोन्याच्या विटा पडल्या , जळिताकडे धावतात . सात – आठ दिवस हाच क्रम . एके दिवशी तर त्यांनी पाढराशुभ्र सोन्याचं घबाड मिळालं , हीच चर्चा . पहाटेच सारी मंडळी हाती लागेल त्या साधनानं कागद हातगाडीवर लादून आणलेला . अलीबाबाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता . सारा भिजलेला . मोठ मोठी कागदाची रिळ होती . साऱ्या घरभर , अंगणात , वलाण्यावर कागद वाळत टाकण्यात आले . घरभर ओल्या कागदाचा चमत्कारिक वास . कागद वाळल्यानंतर जवळच्याच कागदाच्या गुदामात तो चांगल्या भावानं विकला गेला . आपल्या पुढील आयुष्यात ह्या कागदाशीच आपली गाठ पडणार आहे , याची जाणीव त्यावेळी कशी यावी ? कावाखान्यातील सर्वांना मात्र राखेशिवाय काहीच मिळालं नाही . गुंजभर सोन्याचं नाव नको .
नागपाड्याच्या म्युनिसिपालटीच्या शाळेत माझं नाव घातलं . बहुधा दुसरीपर्यंत मी तिथं होतो . बोटात सोन्याच्या अंगठ्या घालणारा एक चांभार मास्तर आठवतोय . शाळेच्या दाखल्यावर माझी जी जन्मतारीख लागली ना ; ती मला कधीच खरी वाटली नाही . कशी वाटणार ? आई – वडील अडाणी . अंदाजपंचे कुठली तरी तारीख घालायची . त्यामुळं कधीच वाढदिवस साजरा झाला नाही . मधली काही वर्षे गाव आणि मुंबई अशी हेलपाटे घालण्यात गेलो . दुसरीनंतर मुंबई सोडली त्यास कारणेही विपरीत घडली . दादा दारूच्या पूर्ण आहारी गेलेले . ही लत त्यांना कधी लागली , हे आठवत नाही . कुणी सांगावं ? माझ्या जन्माच्या आधीपासूनच पीत असावे . तशी परंपराच होती . भोवताली दारू पिणं कुणी वाईट समजत नव्हतं . घरात तसं त्यांचं लक्ष नसायचं . पगार झाला म्हणजे दहा – पंधरा दिवस ते गायब . घरी यायचेच नाहीत . आई विचारी मार्केटात जाऊन कागद गोळा करायची . तिच्या कमाईवर कशीबशी गुजराण व्हायची . कधी कधी आई वैतागायची . पण दादापुढे तोंड उघडायची छाती नव्हती . आम्ही तासन्तास दादांची वाट पाहायचो . गोदीला तसे अनेक दरवाजे . दादा कोणत्या दरवाज्यान गुल व्हायचे , ते कळायचं नाही . गोदीत दादा काय काम करीत होते , त्यांना नेमका पगार काय होता ? हे आता सांगता यायचं नाही . पण एकदा – दोनदा कुणाबरोबर तरी त्यांना भाकर घेऊन गोदीत गेल्याचं चांगलं आठवतं . बाहेरून गोदीतल्या आतल्या भव्य पसाऱ्याची कल्पना येत नाही. हिंदकळणारा , खूप लांबवर पसरलेला निळाजर्द समुद्र . त्यावर उंच इमारतीएवढ्या झुलणाऱ्या बोटी . बोटीतून चढउतार करणारे गोरे साहेब . त्यांचा त्या काळात केवढा रुबाव . इंडियन मजूर म्हणजे त्यांना केरकचरा वाटे.
त्या काळात गोदीतील एका घटनेनं कामगारांत चांगलाच असंतोष पेटला होता . गेटच्या दरवाज्यापाशी एक कामगार मधल्या सुट्टीत आपल्या फडक्यातली भाकरी खात बसलेला . तिथून जाणाऱ्या एका गोऱ्या अधिकाऱ्यानं त्या कामगाराचं जेवण बुटाच्या ठोकरीनं उडवलं . कामगाराला शिवीगाळ केली . साऱ्या गोदीत ह्या घटनेमुळे भडका उडाला . रोकडे नावाच्या एका तरुणानं ह्या प्रकारचा निषेध मोठ्या धारिष्टयानं केला. अधिकारी माफी मागत नाही , तोपर्यंत आमरण उपोषण पुकारलं . त्याचा योग्य तो परिणाम झाला. कामगारांना आपल्या अस्मितेचा शोध लागला . पुढे ह्या गोदीत कामगार नेता म्हणून रोकडे ह्यास कमालीची प्रसिद्धी मिळाली . हे रोकडे कावाखान्यात येतात ; आपल्या वडिलांशी , तात्यांशी बोलतात , ह्याचाच लहानपणी मला अभिमान वाटायचा . तर काय सांगत होतो – दादांचं काम . ते काही स्किल्ड वर्कर नव्हते. एका मोठ्या भट्टीपाशी बसलेले पाहिले . साऱ्या गोदीतला कचरा जाळण्याचं काम त्यांच्याकडे असावं . आता वाटतंय , दादांची अशी सृजनात्मक ताकद ह्या गोंदीनं का बरं नासवली ? दादा किती हुन्नरी होते ! गावाला असताना सनई छान वाजवीत . ढोलकीला शाई भरीत . नोकरीला लागण्यापूर्वी ते एका ब्राह्मणाकडे सालानं होते . तिथं ते कुशल पेरणी करीत . एकदा तर त्यांनी शेतात सळसळत जाणारा साप शेपटीच्या बाजूनं पकडला . त्याला गरगर फिरवला आणि दगडावर आपटला . त्याचे मणके ढिले झाले . असे हे दादा .
पण गोदीत मात्र कचरा जाळण्याच्या कामावर . यामुळं तर त्यांचं दारूचं व्यसन वाढलं नसावं ना ? आज काही सांगता येत नाही . कामावरून सुटले की ते सरळ गुत्त्यावर जात . त्या काळी ठायी ठायी पारशांचे गुत्ते होते . पण मला वाटतं , मोरारजीचा काळ आला आणि हे गुत्ते दिसेनासे झाले . उघड दारू मिळणं कठीण होत गेलं. पण दादा तर थांबू शकत नव्हते . जंगलातल्या एखाद्या प्राण्याला माणसाच्या रक्ताची चटक लागावी ; तसं त्याचं व्यसन हाताबाहेर गेलेलं . त्यांनी काय करावं ? ते चक्क स्पिरिट पिऊ लागले . बोहऱ्याच्या दुकानावर मला ते स्पिरिट आणावयास पाठवीत . स्पिरिट आणताना ते छोटा जर्मनचा टोप घेऊन जाण्यास सांगत . कुणी पकडलंच , तर सरळ टोप खाली सोडून द्यायचा , अशी ट्रिक त्यांनी शिकवली होती . आहे की नाही डोक ? लहानपणी नाकात बसलेला स्पिरिटचा वास आज चांगलाच लक्षात आहे . आठ – बारा आण्यांचं स्पिरिट त्यांना सहज पुरे . स्पिरिटमध्ये ते पाणी ओतत . त्या पेयाला पांढराशुभ्र दुधासारखा रंग यायचा . नाकाजवळ घेतलं तर खूपच उग्र दर्प यायचा . खरं म्हणजे ते पॉयझनच होतं . पिताना दादा गमतीदार दिसत . तोंड वाकडतिकडं करून घशाखाली ते पेय उतरवीत . वाटायचं , पिताना इतका …
क्रमशः
