दिनांक १७ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
मिळालेल्या माहितीनुसार खाक्या ऊर्फ चिंगळ्या जालिंदर काळे (वय ५०) व सुनील खाक्या ऊर्फ चिंगळ्या काळे (वय २०, दोघे रा. ढोकराई, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी ग्रामस्थांनी पकडलेल्या दोघांची नावे आहेत.
शिरसगाव काटा, मांडवगण फराटासह परिसरात गेल्या महिनाभरापासून भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. परिसरात सातत्याने होत चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८:०० वाजता शिरसगाव काटा ग्रामस्थांची बैठक झाली. या वेळी गावातील तरुणांनी गावात रात्रभर गस्त घालण्याचे ठरले.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी(ता. १५) रात्री १०:३० च्या दरम्यान गावातील तरुण गस्त घालत असताना पिंपळसूट्टी बाजूने नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून चार जण तोंड बांधून जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या वेळी ग्रामस्थांनी दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच चालकाने तेथून दुचाकीची लाइट बंद करून पळ काढला. ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून कॉल करून ग्रामस्थांना याबाबत माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी निर्वी बाजूने त्यांचा पाठलाग केला.
यावेळी चारपैकी दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. ग्रामस्थांनी दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ग्रामस्थ व ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या मदतीने दोन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांनी हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी अन्य आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
