दिनांक ३० एप्रिल २०२६, श्रीगोंदा (प्रतिनिधी):
श्रीगोंदा शहरात एका बड्या नेत्याच्या पत्रकार परिषदेत झालेल्या राड्यानंतर आता नवा वाद समोर आला आहे. पत्रकारांची ‘लायकी’ काढल्याच्या विधानावरून संतप्त झालेल्या पत्रकारांनी प्रशासनाकडे आज निषेध नोंदवलेला असतानाच, आता संबंधित नेत्याच्या गोटातून पत्रकारांच्या शैक्षणिक पात्रतेवरच गंभीर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

श्रीगोंद्यातील अनेक पत्रकारांनी कोरोना काळात बनावट पदव्या मिळवल्या असून, काहीजण तोतया पत्रकार म्हणून मिरवत आहेत.. याबाबत लवकरच जिल्हा माहिती अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
२८ एप्रिल रोजी श्रीगोंदा शहरात एका राजकीय नेत्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत प्रश्न विचारण्यावरून नेता आणि पत्रकारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

यावेळी नेत्याने केलेल्या एका विधानामुळे पत्रकारांचा अपमान झाल्याची भावना निर्माण झाली. या घटनेचे पडसाद उमटत असतानाच, पत्रकारांनी आज स्थानिक प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित नेत्याचा जाहीर निषेध केला.
पत्रकारांच्या निषेधानंतर आता नेत्याच्या गोटातून अधिकृत भूमिका मांडण्यात आली आहे. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका विश्वासार्ह व्यक्तीने सांगितले की, “श्रीगोंदा तालुक्यात सध्या अशिक्षित पत्रकारांचा मोठा भरणा झाला आहे.
लोकप्रतिनिधींशी कसे बोलावे, कोणते प्रश्न विचारावे याचे भान या प्रतिनिधींना राहिलेले नाही. केवळ एखाद्या वृत्तपत्राचे नियुक्तीपत्र किंवा आयडेंटी कार्ड मिळाले म्हणजे कोणी ‘पत्रकार’ होत नाही.”
पत्रकार, वार्ताहर आणि प्रतिनिधी यांच्यातील फरकावर त्यांनीभाष्य केले.

यावेळी पत्रकारितेच्या व्याख्येवरूनही ताशेरे ओढण्यात आले आहेत. “पत्रकार होण्यासाठी अधिकृत पत्रकारितेच्या शिक्षणाची (Degree/Diploma) गरज असते. मात्र, श्रीगोंद्यातील बहुतांश प्रतिनिधींकडे अशी कोणतीही सनद नाही.
वार्ताहर म्हणजे एकमेकांच्या बातम्या चोरून प्रसिद्ध करणारे लोक आहेत, तर प्रतिनिधी म्हणजे केवळ चॅनेलने दिलेले काम करणारे व्यक्ती आहेत,” असा दावा या गटाकडून करण्यात आला आहे.

सर्वात खळबळजनक आरोप म्हणजे, कोरोनाच्या काळात अनेकांनी बनावट डिगऱ्या मिळवून स्वतःला पत्रकार म्हणवून घेण्यास सुरुवात केली आहे. ज्यांना पत्रकारितेचा ‘प’ सुद्धा माहित नाही, अशांची यादी आता तयार करण्यात येत आहे. “आम्ही लवकरच जिल्हा माहिती अधिकारी आणि जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे पत्रव्यवहार करून या अशिक्षित आणि बोगस पदव्या घेतलेल्या वार्ताहरांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत,” असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या सर्व प्रकारामुळे श्रीगोंदा तालुक्यात राजकारण आणि पत्रकारिता यांमधील संघर्ष आता टोकाला गेल्याचे चित्र पाहायला मिळत असून, प्रशासकीय स्तरावर याचे काय पडसाद उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
फोटो AI ने तयार करण्यात आला आहे..















Leave a Reply