दिनांक ३० एप्रिल २०२६ आढळगाव:
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील एका तरुणाचा २८ एप्रिल रोजी भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महावीर सर्जेराव गायकवाड (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे वांगदरी परिसरात आणि दलित वस्तीत शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावीर गायकवाड हे आपल्या कामासाठी आढळगाव-कोकणगाव मार्गावरून जात होते. यावेळी एका भरधाव पिकअप चालकाने त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, चालकाने महावीर यांना सुमारे १०० फूट अंतरापर्यंत चिरडत आणि फरफटत नेले. या हृदयद्रावक घटनेत महावीर गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.
महावीर गायकवाड हे अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात: ४ वर्षांचा लहान मुलगा, पत्नी, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.
घरातील कर्ता पुरुष गेल्याने आणि चिमुकल्याचे पितृछत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर पिकअप चालकाच्या बेजबाबदारपणाबद्दल स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून, दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
