दिनांक ३० ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील पश्चिमेकडील एका बागायत गावात असलेल्या गुऱ्हाळात केमिकल सदृश्य पदार्थांचा वापर करून गूळ तयार केला जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याने या घटनास्थळी भेट देऊन कारवाई न करण्याच्या बदल्यात गुऱ्हाळ चालकाकडून तब्बल तीन लाख रुपये उकळल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार तालुक्यात आणि पंचक्रोशीत सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
सविस्तर वृत्तानुसार, तालुक्यातील एका नावाजलेल्या गावातील गुऱ्हाळात चॉकलेटसारख्या केमिकलच्या वड्या वापरून गूळ तयार करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती काही दिवसांपूर्वी प्राप्त झालती. त्यानुसार, अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्याची अपेक्षा होती. मात्र, या कारवाईच्या दरम्यान एक पोलीस कर्मचारी व त्याच्या बरोबर गेलेल्या काही लोकांनी गुऱ्हाळ चालकासोबत आर्थिक व्यवहार केला. असे बोलले जात आहे की, चार ते पाच दिवसांपूर्वी संबंधित पोलिसानी तीन लाख रुपये घेतल्याने कारवाई टाळली गेली आहे.
सध्या तालुक्यातील विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या गैरप्रकारांमुळे खाद्यपदार्थ आणि इतर दैनंदिन वस्तूंमध्ये केमिकलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे निदर्शनास येत आहे. या सर्व घटनांमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमता व उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेमध्ये प्रशासनाने कारवाई टाळून पैसे घेणे ही गंभीर बाब मानली जात आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अशा जीवघेण्या पातकाचे भागीदार केवळ गुऱ्हाळ चालकच नव्हे तर संबंधित पोलिस कर्मचारी असल्याची चर्चा होत आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही, परंतु स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. योग्य तपासणीनंतर या प्रकरणात निष्पक्ष आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)





