जिल्हाभरात दिनांक ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी सप्ताहाचे आयोजन

         अहमदनगर, दि. २८ – भूकंप, पूर, आग, अतिवृष्टी, अपघात, इमारत कोसळणे असा दुर्घटनांना कसे सामोरे जावे आणि दुर्घटना घडली तर त्यापासून कसा बचाव करावा आणि मदत व पुनर्वसन कशा पद्धतीने करावी, याबाबत जनजागृती करण्यासाठी दिनांक ९ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

          येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज यासंदर्भात विविध यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक एस.के.देशमुख, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक विजय गीते, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी बाबासाहेब गोडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

          संयुक्त राष्ट्रसंघाने दिनांक १३ ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात ९ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले आहे. शालेय सुरक्षा, इमारत सुरक्षा, आग आणि भूकंप तसेच इतर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचा मुकाबला कसा करावा, यादृष्टीने या कालावधीत विविध कार्यक्रम जिल्हाभर होणार आहेत. जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, अग्निशमन, पोलीस, होमगार्डस, नेहरु युवा केंद्र, राज्य परिवहन आदी विभाग यांत सहभागी होणार असून यशदातील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ आणि त्यांची टीम याठिकाणी आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहे.                 


Leave a Reply