🚨 पेडगाव रोडवरील पोल्ट्री फार्मवर जुगार अड्ड्यावर विशेष पोलिस पथकाचा छापा; २२ जण ताब्यात, ३७ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त ..🚓.

श्रीगोंदा, दि. २५ जून २०२५:

श्रीगोंदा तालुक्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी थेट कृती सुरू केली असून, त्यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने मोठी धडक कारवाई केली आहे.

या कारवाईत श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेडगाव रोडवरील सोनवणे वस्ती जवळील एका पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी एकूण २२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे. घटनास्थळी पोलिसांनी एकूण ३७ लाख ५८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जप्त मुद्देमालात खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • २ लाख २२ हजार ८०० रुपये रोख रक्कम
  • २४ मोबाईल फोन – अंदाजे किंमत ५ लाख ९६ हजार रुपये
  • ९ चारचाकी वाहने – एकूण किंमत २८ लाख ९० हजार रुपये

या धडक कारवाईमुळे तालुक्यातील जुगार आणि इतर अवैध धंद्यांना चाप बसण्याची शक्यता असून, स्थानिक गुन्हेगारीला मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली असून, अशाच प्रकारच्या मोहिमा जिल्ह्या सह तालुक्यातील इतर भागातही राबवण्यात येणार असल्याचेही खाडे यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच, कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या परिसरात चालू असलेल्या अवैध धंद्यांविषयी माहिती द्यायची असल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी हमी पोलिस प्रशासनाने दिली आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading