“श्रीगोंदा ते पंढरपूर शहीद जवान सायकल वारी: वीरांना मानवंदना, पांडुरंगाला साकडे”

श्रीगोंदा दिनांक २५ जुन २०२५:

श्रीगोंदा म्हटलं की आठवतो मेहनती शेतकरी, देशासाठी लढणारा बहाद्दर जवान आणि अध्यात्मिक तेजाने उजळलेले संत शेख महंमद महाराज यांची पावनभूमी.!

या भूमीतील शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी श्रीगोंदा तालुका सायकल असोसिएशन आणि शहीद जवान स्मारक समिती यांच्या वतीने “शहीद जवान निघाले पांडुरंग भेटीला” या प्रेरणादायी संदेशासह श्रीगोंदा ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते.

वारीचे प्रस्थान संत शेख महंमद महाराज मंदिर परिसरातून झाले. यावेळी शहीद जवानांचे प्रतीक म्हणून वीरपत्नी सोनाली शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवून सायकल वारीला शुभेच्छा देण्यात आल्या. प्रारंभी दिवंगत सायकलपटू डॉ. संजय काळे आणि दिलीप वाबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

वारीदरम्यान विविध ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत…

पळसदेव येथे संजय शेलार, भूषण काळे, तसेच
इंदापूर येथे मरकड कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे मारुती मरकड आणि कैलास गवळी यांनी वारीचे स्वागत केले. हरिओम योग ग्रुप श्रीगोंदा यांनी इंदापुर येथे योग प्रशिक्षण दिले, तर अग्नीपंख फौंडेशनने श्रावणबाळ आश्रमातील विद्यार्थ्यांना सॅग आणि वह्यांचे वाटप केले.

वारीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन, बेटी बचाओ बेटी पढाओ, प्लास्टिकमुक्ती आणि व्यसनमुक्त समाज यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पंढरपूर येथे वारीचे छोटेखानी स्वागत करण्यात आले.

वारीचे नियोजन नवनाथ खामकर, नवनाथ दरेकर, संतोष सांगळे, रमेश सांळुके, अ‍ॅड. संपत इधाते, सुभाष ठोकळ आणि संतोष जाधव यांनी केले.

नवनाथ खामकर म्हणाले, “श्रीगोंदा तालुक्यातील १६ जवान देशासाठी शहीद झाले आहेत. त्यांच्या स्मृती आणि पांडुरंगाच्या भेटीचा ध्यास घेऊन ही सायकल वारी हे सजीव स्मारक ठरते.”

चौकट: सायकल रिंगण सोहळ्यास श्रीगोंदा संघाची हजेरी

शिवशंभु सायकल असोसिएशन, श्रीगोंदा यांच्या विजया लंके यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलपटूंनी श्रीगोंदा ते पंढरपूर वारी केली. पंढरपूर येथे आयोजित सायकल संमेलनात रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला आणि विजया लंके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

वारी यशस्वी होण्यासाठी भाऊसाहेब वाघ, प्रशांत एरंडे, राजेश आगलावे, गोपाळराव डांगे, गणेश कदम, गौरी कोहळे यांनी मोलाचे योगदान दिले. अग्नीपंख फौंडेशनने सर्व सहभागी सायकलपटूंचा विशेष सन्मान केला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading