दिनांक २४ जून २०२५, श्रीगोंदा/जुन्नर:
जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील प्रसिद्ध कोकणकडा परिसरात एका पुरुष आणि एका तरुणीचे मृतदेह सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०, रा. श्रीगोंदा) आणि आंबोली येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे २०) यांचा समावेश आहे.

सदर दोघे काही दिवसांपासून बेपत्ता होते. रामचंद्र पारधी यांच्याबाबत त्यांच्या पत्नीने तोफखाना पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तर रूपालीच्या अपहरणाची नोंद जुन्नर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण होतं.

स्थानिक ग्रामस्थांना रविवारी (२२ जून) दुर्गावाडी कोकणकडा परिसरात रिव्हर्स वॉटरफॉलजवळ पांढऱ्या रंगाची कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे दिसून आले. कारजवळ चपला आढळल्याने ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरित शोधमोहीम सुरू केली, मात्र खराब हवामानामुळे मोहिमेवर काही वेळ थांबा घालावा लागला.

सोमवारी (२३ जून) सकाळी रेस्क्यू टीमने मोहीम पुन्हा सुरू करत सुमारे १२०० फूट खोल दरीतून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जुन्नर येथील श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

सदर घटनेबाबत पोलीस प्रशासनाने अधिक तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, मात्र पोलीस सर्व शक्यतेचा तपास करत आहेत.

ही घटना घडल्यापासून जुन्नर आणि श्रीगोंदा तालुक्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एक सरकारी कर्मचारी आणि एका तरुण विद्यार्थिनीचा असा मृत्यू होणे दुर्दैवी असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
