आदिवासी महिलेला कुटुंबातील लहान मुलांनासह जमिनीच्या वादातून मारहाण..आरोपीं विरोधात एट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल..

श्रीगोंदा दिनांक २७ एप्रिल:

           श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथील रहिवासी व आपले स्वतःचे व मुलांचे आपल्या जमिनीच्या तुकड्यावर गुजारा करणाऱ्या,शारदा रमेश पवार या आदिवासी समाजाच्या महिलेला येथीलच तीन इसमांनी जातीवाचक शिवीगाळ करीत केसाला धरून रस्त्यांवर फरफटत नेत ,मारहाण केल्याची घटना घडली आहे.शिवाय मारहाणीत सोडवायला गेलेल्या लहान मुलांना ही या तीन जणांनी बेदम मारले असल्याचे,या पीडित महिलेने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.त्यानुसार श्रीगोंदा पोलिसांनी त्या तीन लोकांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे.
        सविस्तर वृत्त असे की,श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथील रहिवासी माणिक नरोटे, हनुमंत माणिक नरोटे, तानाजी नरोटे या तीन इसमांची जमीन आहे.मिळालेल्या माहितीनुसार,शारदाच्या संबंधितांनी काही वर्षांपूर्वी या नरोटेंच्या शेजारी जमीन घेतल्याचे समजते आहे.मात्र त्यावेळी आलेल्या अडचणी मुळे,शारदाने नरोटे यांच्या कडून काही जमिनीच्या मोबदल्यात रक्कम घेतली,तेंव्हा पासून नरोटे त्या जमिनीत पीक घेत आले.या ठिकाणी असलेल्या या आदिवासी महिलेचे पक्की घरे ही नरोटे यांनी पाडल्याचे ही शारदा सांगत आहे.तो विषय माननीय कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे.
          दिनांक २५ एप्रिल रोजी शारदाने पावसाळ्यात मुलांच्या आडोश्यासाठी तिच्या राहत्या पालाच्या जागेवर शेड बांधण्याचे ठरविले.त्यासाठी आणलेल्या पत्राच्या आणि साहित्याच्या गाडीला आडवत,सदर सामान खाली करण्यास नरोटे यांनी मज्जाव केला.शिवाय शारदाला केसाला धरून त्या जमिनीतुन रस्त्यावर फरफटत नेले.जातीवाचक शिवीगाळ करीत,मारहाण केली.यावेळी शारदाला सोडवण्यासाठी गेलेल्या लहान मुलींना मारहाण करण्यात आली आहे.यातील मेघा रमेश पवार,पूजा रमेश पवार,सानिया राजेश पवार,यांना माणिक नरोटे याने लथाबुक्यांनी मारहाण करून ढकलून दिले.तर सानियाच्या हाताला तानाजी नरोटे याने जोराचा चावा घेतला.
       या सर्व घटनेवरून श्रीगोंदा पोलिसांत शारदा पवार या आदिवासी महिलेने दिलेल्या तक्रारिवरून वरील नमूद तिन्ही लोकांच्या विरोधात एट्रोसिटी नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक,(श्रीगोंदा) दौलतराव जाधव हे करीत आहेत.

Leave a Reply